Friday, 2 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      रुग्णाला सन्मानाची वागणूक देऊन उपचार करावेत-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे निर्देश.

·      मुंबै बँक घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना दिलासा.

·      यंदाचा ग.दि.माडगुळकर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर.

आणि

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नियोजित राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी पूर्ण.

****

नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक देऊन उपचार करावेत, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. ते आज अमरावती इथं आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. रुग्णसेवेत कुठल्याच प्रकारची हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा सावंत यांनी या बैठकीत दिला. प्रत्येक रुग्णालयात स्वच्छता असावी, नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, असे निर्देशही सावंत यांनी दिले.

****

इटली देशातल्या एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क या ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित असलेल्या कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जेसह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी आज फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी ही माहिती दिली. आगुर्तो यांनी, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथेच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था करणार असल्याचं सांगितलं.

****

राज्यातील जनता शिवसेनेसोबत असल्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तरी कोणत्याही चिन्हावर राज्यात शिवसेनेसहीत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि शिवसेना त्याचं नेतृत्व करेल असा विश्वास शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते आज नाशिक इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकाही शिवसेनाच जिंकेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल तसंच पर्यटन मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं कथित आक्षेपार्ह विधान, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सोडलेलं पाणी, आदी मुद्यांवरूनही राऊत यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

****

नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या काही गावांनी गुजरातमध्ये विलीनीकरणाची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी तहसीलदारांना या मागणीचं लेखी निवेदन दिलं. रस्ते, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट सेवा, वीज या सेवा उपलब्ध न झाल्यामुळे गुजरातमध्ये विलीन होऊ देण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

दरम्यान, ही मागणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गावित यांचं हे वैयक्तीक मत असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी दिलं आहे. कळवण-सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांच्या कामांना राज्य सरकारने स्थगिती दिल्याचं पगार यांनी सांगितलं. याच कारणामुळे गावित यांनी निराशेपोटी असं मत मांडलं असावं असं पगार यांनी म्हटलं आहे.

****

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा दिला आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितता प्रकरणात दरेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरूपयोग करून आणि बनावट कागदपत्रांद्वारे १२३ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून २७ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****

पोलिस विभागातल्या विविध संवर्गातल्या पदोन्नतीसाठी तात्पुरती निवड यादी तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याकरता विभागीय स्पर्धा परीक्षेतल्या एक हजार ३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने घेण्यात आली. शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर चार तासांतच लोकसेवा आयोगाने निवड यादी तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

****

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा ग.दि.माडगुळकर पुरस्कार यावर्षी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गदिमा यांच्या स्मृतिदिनी येत्या १४ तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासोबतच साधना बहुलकर यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार, प्रवीण तरडे यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका योगिता गोडबोले यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभात शितल माडगूळकर यांनी लिहिलेलं ‘गदिमांच्या पंचवटीतून’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या क्रीडा सोहळ्यात पाच खेळांचा समावेश करण्यात आला असून, दोन हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो पुरुष तसं महिला गटात सहभागी होणारे संघ आजपासून दाखल व्हायला सुरवात झाली आहे. विद्यापीठात क्रीडा विभाग परिसर इथं उद्या दुपारी तीन वाजता या स्पर्धांचं उद्‌घाटन होणार आहे.

दरम्यान, राज्य क्रीडा महोत्सवाची ‘क्रीडाज्योत मशाल फेरी’ आज सकाळी जालना शहरात दाखल झाली. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके आणि क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रताप रामपुरे यांनी या मशालीचं स्वागत केलं. ३० तारखेला तुळजाभवानी मंदिरातून ही ज्योत प्रज्वलित करून या फेरीला सुरूवात झाली. आज रात्री ही ज्योत औरंगाबाद शहरात दाखल होत आहे.

****

प्रगतीशील लेखक संघाच्या वतीनं औरंगाबादेत उद्यापासून दोन दिवस ११वं कॉम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. आज संमेलनाच्या पूर्वसंध्येला शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे. तर उद्या सकाळी ८ ते १० या वेळेत औरंगपुरा परिसरातल्या सावित्रीबाई आणि जोतिबा फुले पुतळा परिसरातून संमेलन स्थळ अशी कविता फेरी काढण्यात येईल. या फेरीत मराठी - हिंदीतल्या निवडक कवींच्या कवितांचं खुल्या वाहनावरून सादरीकरण होईल. दहा वाजता तापडीया नाट्यमंदिर इथं कवी सतीश काळसेकर ग्रंथ दालनाचं उद्धाटन होऊन मुख्य उद्धाटन समारंभाला सुरुवात होईल. या संमेलनात ‘साहित्याला चळवळीची गरज असते का?’ या विषयावरील परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, राज्य पुरस्कार प्राप्त एकांकिका ‘कामगार चौक’ आणि त्यानंतर मुंबई लोककला अकादमीचे प्रमुख शाहीर डॉ.गणेश चंदनशिवे आणि अन्य शाहिरांचा शाहिरी जलसा आणि अण्णाभाऊंची गाणी सादर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

****

मीटर कॅलिब्रेशन तपासणीच्या नावाखाली अन्यायकारक दंड आकारणी बंद करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आयटक संलग्न लाल बावटा रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे आज औरंगाबाद इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं केली. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदना द्वारे देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता, या पार्श्वभूमीवर आर टी ओ ने रिक्षा स्टॅन्डवर जाऊन जागृती करावी अशीही मागणी करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक गावठी पिस्तुल, दोन काडतुसं आणि एक खंजीर जप्त केला आहे. कुरुंदा ते बोल्डा मार्गावर एका चारचाकीच्या तपासणीत ही शस्त्रं जप्त करण्यात आली. या प्रकरणी वसमत इथल्या कैलास शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...