Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
जी ट्वेंटी बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नये-मुख्यमंत्र्यांची सूचना
·
राज्यात कधीही निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीचं सरकार येणार-खासदार संजय राऊत
·
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दिलासा
·
यंदाचा ग.दि.माडगुळकर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर
·
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या
अनुयायांच्या सोयीसाठी यंत्रणा सज्ज
·
विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्राला हरवत
सौराष्ट्र संघ विजयी
आणि
·
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून राज्य क्रीडा महोत्सव
****
जी ट्वेंटी परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नये अशी सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या
बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते. भारताला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळालं असून ते
३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१
बैठका होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर
या महानगरांमध्ये होणार आहेत. या परिषदेच्या आखणी आणि नियोजनाकरता चार अधिकाऱ्यांची
समन्वय समिती नेमली आहे. भारताला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळणं ही अतिशय गौरवशाली
बाब असून राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची ही संधी असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता या वर भर
द्यावा, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथं येत्या १३ आणि १४ फेब्रुवारीला ही बैठक होणार आहे.
****
जत तालुक्यातील गावांसाठी विस्तारीत
म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत
होते. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. सीमा भागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, वीज तसंच पायाभूत
सुविधांबाबत संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी
या बैठकीत दिल्या.
****
राज्यातील जनता शिवसेने सोबत
असल्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तरी कोणत्याही चिन्हावर राज्यात शिवसेनेसहित महाविकास
आघाडीचं सरकार येईल आणि शिवसेना त्याचं नेतृत्व करेल असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार
संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकाही शिवसेनाच जिंकेल,
असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल तसंच पर्यटन मंत्र्यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं कथित आक्षेपार्ह विधान, सांगली जिल्ह्याच्या
जत तालुक्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सोडलेलं पाणी, आदी मुद्यांवरूनही
राऊत यांनी राज्यसरकारवर कडाडून टीका केली.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र
विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.
या विधेयकाला मान्यता मिळाल्यानं मुंबईतील धोकादायक तसंच उपकर प्राप्त इमारतींच्या
पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले किंवा
रखडलेले उपकरप्राप्त -सेस इमारत प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्याचा पुनर्विकासही
शक्य होणार आहे.
****
इटली मधल्या एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर
ॲन्ड नेटवर्क या ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित असलेल्या कंपनीने ऊर्जा,
नवीकरणीय ऊर्जेसह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं आहे.
त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असं उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख
मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी काल फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर फडणवीस
यांनी ही माहिती दिली. आगुर्तो यांनी, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी
लागणारं कुशल मनुष्यबळ भारतातच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था
करणार असल्याचं सांगितलं.
****
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै
बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा दिला आहे. मुंबै
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितता प्रकरणात दरेकर
यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं आहे.
मुंबै बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांद्वारे
१२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला होता.
****
पोलिस विभागातल्या विविध संवर्गातल्या
पदोन्नतीसाठी तात्पुरती निवड यादी तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस
उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याकरता एक
हजार ३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. २८ नोव्हेंबर २०२२ ते काल ०२ डिसेंबर
२०२२ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार तासातच लोकसेवा आयोगाने निवड यादी
तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमी इथं येणाऱ्या
अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका,
पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.
सर्व सुविधांचा आढावा घेतल्यानंतर काल ते बोलत होते. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची
तसंच बिस्किटांची सोय, आरोग्य सुविधा, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आच्छादन आणि कार्पेट
टाकण्याची सूचना त्यांनी केली. फिरती स्वच्छतागृहं, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटची
व्यवस्था आदींचाही आढावा त्यांनी घेतला. अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था शिवाजी पार्क
इथं करण्यात आली आहे.
****
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा ग.दि.माडगुळकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध
अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि
स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गदिमा यांच्या स्मृतिदिनी येत्या १४ तारखेला
हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासोबतच साधना बहुलकर यांना गृहिणी
सखी सचिव पुरस्कार, अभिनेते प्रवीण तरडे यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका योगिता गोडबोले
यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभात शितल माडगुळकर
यांनी लिहिलेलं ‘गदिमांच्या पंचवटीतून’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****
आकाशवाणीवरून आज डॉ राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानाचं प्रसारण होणार आहे. अमृत
काल में भारतीयता हा यंदाच्या व्याख्यानाचा विषय आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या
विषयावर व्याख्यान देणार आहेत. आकाशवाणीवरून रात्री साडेनऊ वाजता या व्याख्यानाचं प्रसारण
केलं जाईल. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
१९६९ पासून या व्याख्यानमालेला सुरूवात झाली आहे.
****
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत नागरी विमानसेवा सुरू करण्याची
ग्वाही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा आणि
योगीन गुर्जर यांच्या शिष्टमंडळानं काल शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी शिंदे बोलत
होते. या विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण थांबवण्याची विनंती शिंदे यांनी
केली. या उपोषणाबाबत सोलापूर विकास मंचच्या इतर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन निर्णय
घेतला जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यंदाचा विजय
हजारे क्रिकेट करंडक सौराष्ट्र संघानं जिंकला आहे. अहमदाबाद
इथं काल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल सौराष्ट्र संघानं महाराष्ट्र संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम
फलंदाजी करताना महाराष्ट्रानं निर्धारीत ५० षटकात ९ गडी बाद २४८ अशी धावसंख्या
उभारली. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता. वि़जयासाठी
२४९ धावांचं लक्ष्य सौराष्ट्रनं २१ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असताना सहज पार केलं.
सौराष्ट्रनं दुसऱ्यांदा हा करंडक जिंकला आहे.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत
आजपासून अंतिम १६ संघात लढती सुरू होणार आहेत. आज रात्री साडे आठ वाजता अमेरिका आणि
नेदरलंड तर रात्री साडे बारा वाजता अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया संघात सामने होणार आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात आजपासून सुरू होत असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
या क्रीडा सोहळ्यात पाच खेळांचा समावेश करण्यात आला असून, दोन हजाराहून अधिक खेळाडू
यात सहभागी होणार आहेत अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो पुरुष
तसं महिला गटात सहभागी होणारे संघ कालपासून दाखल व्हायला सुरवात झाली. विद्यापीठात
क्रीडा विभाग परिसर इथं आज दुपारी तीन वाजता या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे.
****
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं औरंगाबादेत
आजपासून दोन दिवस ११वं कॉम्रेड अण्णा भाऊ
साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. आज सकाळी दहा वाजता तापडीया नाट्यमंदिर इथं कवी
सतीश काळसेकर ग्रंथ दालनाचं उद्धाटन होऊन मुख्य उद्धाटन समारंभाला सुरुवात होईल. त्यापूर्वी सकाळी ८ वाजता औरंगपुरा परिसरातल्या सावित्रीबाई आणि जोतिबा फुले पुतळा परिसरातून संमेलन स्थळापर्यंत कविता फेरी काढण्यात येईल. या फेरीत मराठी - हिंदीतल्या निवडक कवींच्या कवितांचं खुल्या वाहनावरून
सादरीकरण होईल. विविध विषयावरील परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, आणि अण्णाभाऊंची गाणी सादर होणार
असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
****
मीटर कॅलिब्रेशन तपासणीच्या नावाखाली
अन्यायकारक दंड आकारणी बंद करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आयटक संलग्न लाल बावटा रिक्षाचालक
मालक संघटनेनं काल औरंगाबाद इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं केली. मागण्या
मंजूर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता, या पार्श्वभूमीवर
आर टी ओ ने रिक्षा स्टॅन्डवर जाऊन जागृती करावी अशीही मागणी करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी
तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक गावठी पिस्तुल, दोन
काडतुसं आणि एक लोखंडी खंजीर जप्त केला आहे. कुरुंदा ते बोल्डा मार्गावर एका चारचाकीच्या
तपासणीत ही शस्त्रं जप्त करण्यात आली. या प्रकरणी वसमत इथल्या कैलास शिंदे याला पोलिसांनी
अटक केली आहे.
****
राज्यातली स्वस्त धान्य दुकानं
महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांच्या आणि नगरपंचायतीत सदस्यांच्या अध्यक्षतेखाली चालवण्यासाठी
देण्यात यावी अशी मागणी राज्य प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं
आहे. सगळ्या स्वस्त धान्य दुकानांचं लेखापरिक्षण करण्यात यावं, स्वस्त धान्य दुकानं
महिन्याचे २४ दिवस उघडी ठेवण्यात यावीत आदि मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात एस टी बस आणि
दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. जांभरून आंध
ते भोसी मार्गावर जांभळीफाट्याजवळ काल सकाळी हा अपघात झाला. मारुती जुमडे असं मृताचं
नाव आहे.
****
No comments:
Post a Comment