Wednesday, 21 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 21.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  21 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव काळात अधिक सतर्क राहण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं आवाहन.

·      राज्य सरकारकडून सोयीनुसार न्यायप्रविष्ट मुद्यांचं कारण पुढे करून सदनात चर्चा टाळली जात असल्याचा विरोधी पक्षाचा आरोप.

·      महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध तसंच शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची समिती स्थापन होणार.

·      मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा.

आणि

·      २२ व्या राष्ट्रीय वायूजीवशास्त्र परिषदेला हिंगोलीत प्रारंभ.

****

कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव काळात अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. जगभरात चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढत्या कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडची सद्यस्थिती, त्याच्या प्रसाराला प्रतिबंध, आणि कोविड व्यवस्थापन याबाबत चर्चा झाली. चीनमध्ये सध्या झालेल्या संसर्गाला ओमायक्रॉनचा नवा अत्यधिक संसर्गजन्य अवतार बी एफ सेवन हा कारणीभूत असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं. देशात कोविड संक्रमित रुग्णांचे नमुने दररोज जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्याची सूचनाही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली. नवीन व्हेरियंट तयार झाला, तर त्याचा माग काढण्यासाठी ही तपासणी सहायक ठरेल, असं मांडवीय यांनी म्हटलं आहे. जून २०२२ मध्ये कोविड संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सुनिश्चित करण्याचे निर्देशही मांडवीय यांनी दिले.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. आज लोकसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत शेवाळे यांनी अधिक माहिती दिली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या दूरध्वनीवर एयू नावाने ४४ फोन कॉल आले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात एयू म्हणजे आदित्य उद्धव असल्याचं समोर आलं असल्याचं, खासदार शेवाळे यांनी सांगितलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास अहवाल, सीबीआयचा तपास अहवाल तसंच बिहार पोलिसांचा अहवाल यात तफावत आहे, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी माहिती लपवल्याची शक्यताही शेवाळे यांनी वर्तवली. त्यामुळे या प्रकरणी सत्य माहिती संबंधित यंत्रणांनी समोर आणावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली.

****

राज्य सरकारकडून आपल्या सोयीनुसार न्यायप्रविष्ट मुद्यांचं कारण पुढे करून सदनात चर्चा टाळली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या सद्सद्‌विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा, असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, छगन भुजबळ, जीतेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, आदी सदस्यांनी केलं. कायदे तयार करणाऱ्या कायदेमंडळाला कोणत्याही मुद्यावर चर्चेचा अधिकार असला पाहिजे, असं मत या सदस्यांनी व्यक्त केलं. अध्यक्ष नार्वेकर यांनी मात्र न्यायप्रविष्ट विषयांवर चर्चा न करण्याची आपली भूमिका कायम ठेवली. ते म्हणाले –

सन्माननीय सदस्यांनी जेव्हा हा प्रश्न मांडला, तेव्हा या प्रश्नात कुठेही हे मॅटर सबज्युडीयस असण्याचा उल्लेख नव्हता, नंबर एक. शासनाकडनं उत्तर आल्यानंतर हे मॅटर सबज्युडीयस आहे, यासंबंधातली माहिती सभागृहाला मिळाली. आपल्या विधीमंडळाचं ज्युरीस्‌डीक्शन हे आपल्या नियमातून एस्टाब्लिश होतं. सबज्युडीयस मॅटरमध्ये आपण उल्लेख न करता, न बोलणं हे जास्त उचित राहील. एखाद्या बाबीबद्दल आपण, डिसक्शन केलं नाही, म्हणजे आपण कुठच्याही कोर्टाच्या अथवा एक्झिक्युटीव्हच्या ज्यरीस्‌डीक्शनला स्वतःला सबमिट करत आहोत अशी भूमिका अजिबात कोणी समजून घेऊ नये.

****

कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विरोधी पक्षांनी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमीन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.

 

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरीचा सल्ला दिला असून, यासंदर्भात राज्य सरकार समिती नेमणार का, असा प्रश्न देखील पवार यांनी विचारला. कोविड संदर्भात बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती किंवा कृती दल गठीत करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.

स्वमग्नता आणि गतीमंद अर्थात ऑटिझम आजाराने ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारण्यात येतील, या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट केलं जाईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती.

****

शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसंच शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात आहेत का, असा सवाल त्यांनी केला. अल्पवयीन मुलांकडून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करणं आवश्यक असून त्याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात का असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. अकोला, बीड सारख्या जिल्ह्यांत महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींसोबत घडलेले प्रकार दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास दिले. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्ती करण्याबाबत सूचना केली जाईल तसंच शक्य असल्यास मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत गुड टच बॅड टचचे पोलीस दिदींकडून धडे देण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध तसंच शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची समिती तयार करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिलं.

****

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन -एमआयएम च्या वतीनं आज नागपूर इथं विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचे निर्देश दिले असूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही, त्याची आठवण करुन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं जलील यांनी सांगितलं.

****

२२ व्या राष्ट्रीय वायूजीवशास्त्र परिषदेला हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं प्रारंभ झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या वतीनं ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.कृष्णराव पाटील जरोडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. या तीन दिवसीय राष्ट्रीय अॅरोबॉयलॉजी परिषदेत देशाच्या विविध भागातील संशोधक सहभागी झाले आहेत. अनेक संशोधक आपलं संशोधन या परिषदेत मांडणार आहेत 

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथल्या शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची छेडछाड केलेली छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित करण्यात येणार असून पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****

किल्लारी भूकंपातील सर्व पात्र बाधितांचं पुनर्वसन झालेलं असून, काही पात्र बाधित यापासून वंचित असतील तर त्यांचंही पुनर्वसन केलं जाईल, अशी माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सदस्य अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या एका लक्षवेधीला उत्तर देतांना सामंत बोलत होते. पुनर्वसनासाठी ४५ हजार कोटींचा प्रस्ताव आहे. ७२६ गावांच्या पुनर्वसनासाठी निधी दिला असून पुनर्वसन करुन घरांचं वाटपही करण्यात आलं आहे. त्या गावांतील रस्ते इतर सोयी-सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

स्पंदन आर्ट या संस्थेचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया तसंच महंमद रफी पुरस्कार प्रसिध्द गायिका दिलराज कौर यांना जाहीर झाला आहे. भाजपा नेते विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. या दोन्ही पुरस्कारांचं स्वरुप अनुक्रमे एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह तसंच ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...