Wednesday, 21 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चीनसह जगातल्या काही देशात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता, केंद्र सरकारने आज यासंदर्भात विशेष बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतानं कोरोना लसीकरणात समाधानकारक टप्पा गाठला असून, हे आरोग्य यंत्रणेचं मोठं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशातल्या कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांची जनुकीय क्रमनिर्धारण अर्थात जिनोम सिक्वेंसींग करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतचं पत्र राज्यांना पाठवलं आहे.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत १२ लाख ९४ हजार नव्या सदस्यांची भर पडली आहे. ईपीएफओनं जाहीर केलेल्या अहवालानुसार २०२१ च्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरपर्यंत निव्वळ सदस्यत्वात २१ हाजार २६ ने वाढ झाली आहे. संघटित क्षेत्रातल्या नवीन रोजगाराच्या संधी युवकांपर्यत पोहोचत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

एखाद्या व्यक्तीसाठी मूलभूत आयकर सवलत मर्यादा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या वर्गीकरणासाठी त्रिस्तरीय उत्पन्न मर्यादा यांची तुलना करता येत नाही, असं सरकारनं आज राज्यसभेत स्पष्ट केलं. या दोन्हींची वेगवेगळ्या हेतूंसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं गणना केली जाते, असं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं.

****

पाचवी स्कॉर्पियन युद्धनौका वजीर काल भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. ही युद्धनौका विरोधी पृष्ठभाग, पाणबुडी विरोधक, आदींसाठी तयार करण्यात आली आहे.

****

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तत्काळ बैठक घेऊन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. पुण्यात भिडे वाडा या ठिकाणी हे स्मारक उभारण्याचा मुद्दा सदस्य छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान पाच टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या कालच्या शेवटच्या सामन्यात भारताचा ५४ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियानं ही मालिका चार - एकनं जिंकली आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...