Thursday, 22 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 22.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  22 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरतीप्रक्रिया कालबध्द पद्धतीनं तातडीनं राबवणार - मंत्री केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती.

·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं नागपूर अधिवेशन काळासाठी निलंबन.

·      दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

आणि

·      भारतानं दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा डाव २२७ धावांवर रोखला.

****

अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरतीप्रक्रिया कालबध्द पद्धतीनं तातडीनं राबवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज नागपूरमध्ये विधानपरिषदेत दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर घेतल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देतांना केसरकर बोलत होते. अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरतीप्रक्रियेत आदिवासी समाजाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं.

****

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याबाबत कथित अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं नागपूर अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं आहे. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. पाटील यांनी अध्यक्षांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यासाठी आचरण समिती स्थापन करण्याची तरतूद ठरावात करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा भवनाबाहेर सरकारविरोधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. पाटील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले -

जे काही बोललो ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो. पण सरकारला काहीतरी करून आजचा प्रसंग टाळायचा होता. म्हणून त्यांनी अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं. आणि त्याचा निलंबानाचा प्रस्ताव आणला. ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही.

****

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत असून या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे, असं ते म्हणाले. तत्पूर्वी, या प्रकरणावरुन सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळं सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब झालं. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर टीका केली. ते म्हणाले –

राज्यपाल हटावची आम्ही सतत मागणी करत आहोत, ज्या राज्यापालांनी या महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, महात्मा फुलेंचा अपमान केलाय, त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सगळं कुठेतरी विचलित करायचं, ह्याच्यासाठी येतंय. जे काही शोधायचं शोधु द्या. महत्वाची गोष्ट हीच राहते की एन आय टी चा जो घोटाळा आहे, तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीयेत. आणि म्हणून हे सगळं चालूये.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करता येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. जयंत पाटील, एकनाथ खडसे, डॉ.सुधीर तांबे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ही योजना लागू केल्यास राज्यावर एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात व्याज, वेतन आणि निवृत्तीवेतनावर शासनाचे ५९ टक्के खर्च केले जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भात आमदारांची नवीन समिती नियुक्त केली जाणार नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

****

राज्यात सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी या वर्षाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. ते आज विधानसभेत यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते. यासंदर्भात राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती सरल प्रणालीवर भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एकही विद्यार्थी आधार संलग्न नसल्याच्या कारणावरुन योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात आतापर्यंत दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांची नोंद या सरल प्रणालीवर करण्यात आली आहे.

****

महावितरण मध्ये लवकरच पदभरती करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. महावितरण मध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक कामगारांची जवळपास २६ हजार ६४८ पदे रिक्त आहेत मात्र कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्यानं भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, तसंच त्यांना सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वीज महामंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नसल्याचंही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं.

****

कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक बैठक घेत आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. ही बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत असून यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आदी सहभागी झाले आहेत.

****

राज्यात गोवर आजाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कृती दलाची निर्मिती केली असून या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत यासंबंधी प्रश्नावर उत्तर देतांना बोलत होते. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या शंभर टक्के आटोक्यात आणू तसंच संबंधित उपाययोजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना घेऊन या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. वेगावर नियंत्रण, अवजड वाहनांनी नियम पाळणे आदी बाबींकडे या संदर्भात लक्ष देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या १७ ऑक्टोबरला बैठक घेऊन यंत्रणेला निर्देश दिले असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणी काही दस्ताऐवजांची प्रत दानवे यांनी पत्रकारांना दिली. शिंदे फडणवीस सरकारचा भ्रष्टाचाराचं पितळ उघड झालं असून मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

****

भारतानं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवस अखेर बिनबाद १९ धावा केल्या आहेत. ढाका इथं शेर-ए-बांगला मैदानावर सुरू या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार गडी आणि जयदेव उनाडक्टनं दोन गडी बाद करत बांगलादेश संघाचा डाव २२७ धावांवर बाद केला. मोमीनुल हक यानं १५७ चेंडुंमध्ये बारा चौकार आणि एका षटकारासह ८४ धावा केल्या. खेळ थांबला तेंव्हा कर्णधार के. एल. राहुल तीन आणि शुभमन गिल १४ धावा काढून खेळत होते. भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यातल्या विजयामध्ये सामनावीर ठरलेल्या कुलदिप यादवला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

****

निझामाबाद नांदेड निझामाबाद ही विशेष परवा, शनिवारपासून २७ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. सिकंदराबाद विभागातल्या तांत्रिक समस्ये मुळं ही रेल्वे रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात खाजनापुर वाडी,आंबा, कुरुंदा,यासह कळमनुरी तालुक्यातील कवडा यासह इतर गावांत आज दुपारी दोन वाजे दरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यात कोणतही नुकसान झालं नसल्याची माहिती तलाठी एन. गिते यांनी दिली. दरम्यान, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, शिरळी, वापटी, कुपटी, डोनवाडा, कुरुंदा, सेलू, आंबा यासह २० गावात काल भूकंपाचा धक्का जाणवला होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्यात गॅलेक्सी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्या ५९ वर्षांच्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...