Thursday, 2 May 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.05.2024, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 02 May 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.

****

चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.

****

इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

****

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.

****

छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.

****

बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.

****

येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.

****

भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...