Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट, भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार
· पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य-सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
· महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
· राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं काल ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेनेनं काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री-भारत राष्ट्र समिती-बी.आर.एसचे पक्षाध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी घालण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली.
****
महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल वेल्हे इथं सभा घेतली. भाजपवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप करत, या देशात आपण हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही, असं नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा इथं सभा घेतली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काल इचलकरंजी इथं सभा झाली.
****
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजप नेते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल सोलापूर इथं सभा झाली. काँग्रेसच्या काळात रूढ झालेल्या हिंदू आतंकवादी या शब्दावरून आदित्यनाथ यांनी टीका केली. सांगलीतले महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठीही योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरीत सभा होणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद तसंच लातूर लोकसभा मतदारसंघांत आजपासून पाच मे दरम्यान ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृह मतदान होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील तीन हजार ५४२, आणि ८५१ दिव्यांग तर लातूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील एक हजार ८९३, आणि ४६३ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार आहेत.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन काल साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळी आपल्या भाषणातून केलं.
**
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना शुभेच्छा त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
**
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
**
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
हवामान
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात ३ ते ५ मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment