Saturday, 22 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.06.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 June 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार-आंदोलन मागे घेण्याचं सरकारचं आवाहन

·      जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प राबवणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      दहावा आंतरराष्ट्रीय योगदिवस मराठवाड्यात उत्साहात साजरा

·      केंद्र सरकारकडून तूर, हरभरा आणि काबुली चण्याच्या साठ्यावर नियंत्रण

आणि

·      मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप-‘द गोल्डन थ्रेड’ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट  

 

सविस्तर बातम्या

ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जालना तसंच पुण्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरु असलेल्या उपोषणाच्या अनुषंगानं काल मुंबईत ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी, ओबीसी तसंच मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं. खोटी कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर तसंच घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसंच राज्यात सर्वच जातींची प्रमाणपत्रं त्यांच्या आधार कार्डाशी जोडण्यात येतील, असंही सरकारकडून सांगण्यात आलं. मराठा समाजाला सारथी महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षण, शिष्यवृती आदी सवलती ओबीसी समाजालाही देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ आज जालना तसंच पुण्यात आंदोलनकर्त्यांना भेटून उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं, भुजबळ यांनी सांगितलं.

त्यापूर्वी काल सकाळी राज्यसरकारच्या शिष्टमंडळानं जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या २९ टक्के आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाहीं याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली ५७ लाख प्रमाणपत्रं रद्द करावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती.

 

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काल यासंदर्भात ट्विट संदेश जारी करत, मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी, असं म्हटलं आहे. राज्याच्या प्रमुखांनी आंदोलनस्थळी भेट द्यावी, राज्यातल्या समस्त बहुजनांचा तो सन्मान ठरेल, असंही मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

****

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प राबवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बाब स्पष्ट केली. जनतेला विश्वासात घेऊनच नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग पूर्ण केला, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही फेरआखणी करता येईल का, याचा विचार सुरु असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दहावा आंतरराष्ट्रीय योगदिवस मराठवाड्यात काल उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थित मुख्य कार्यक्रम पार पडला. शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगबाद खंडपीठ, विविध शासकीय कार्यालयं, शैक्षणिक संस्था, पर्यटन विकास महामंडळ, आदी ठिकाणी योगशिबीरं घेण्यात आली. बोटॅनिकल गार्डन इथं घेण्यात आलेल्या योग शिबिरात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उप अधीक्षक वैभव पाटील, यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.

****

नांदेड इथं गुरूग्रंथ साहिबजी भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत, तर लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह हजारो नागरिकांनी योग प्रात्यक्षिकं केली.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत राजगोपालाचारी उद्यानात तर हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्या उपस्थितीत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयातही योगशिबीर घेण्यात आलं.

****

जालना इथं पतंजली योग समिती, महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसंच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी योगाभ्यासाचे धडे दिले. माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले होते.

****


बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, यांच्यासह जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांनी योगासनं केली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर योगशिबिर घेण्यात आलं. ४५० नागरिक, खेळाडू तसंच विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग कार्यालयात विभागीय व्यवस्थापक नीति सरकार यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला. विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांवरही योगाभ्यास शिबीरं घेण्यात आली.

****

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसल्याचं, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण-एम एम आर डी ए कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यावर किरकोळ भेगा आढळून आल्या होत्या, त्या बुजवण्याचं काम काल सुरू करण्यात आलं. सर्व्हिस रोडवरच्या या भेगांमुळे अटल सेतुला कोणताही धोका नसल्याचं, एमएमआरडीएनं सांगितलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

केंद्र सरकारनं तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर नियंत्रण घातलं आहे. घाऊक तसंच किरकोळ व्यापारी, डाळ मिलचे मालक, बहुशुंखला किरकोळ विक्रेते, आणि आयातदार या सगळ्यांनाच हा निर्णय लागू आहे. ही साठेमर्यादा ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.

****

आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख कायम ठेवली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच्या आकाशवाणीच्या अतूट वचनबद्धतेचं हे द्योतक असल्याचं, प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी म्हटलं आहे. सेहगल यांनी दिल्लीत आकाशवाणी कार्यालयात योगदिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आकाशवाणीच्या महासंचालक मौशुमी चक्रवर्ती यावेळी उपस्थित होत्या.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानं मंजूर केलेल्या जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी वकीलांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****

निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह एकूण चार राज्यांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या २६ नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. त्यादृष्टीनं मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरु केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या १५७ विद्यापीठांवर लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि दोन अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यात परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुंबईतलं एस एन डी टी विद्यापीठ, नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक इथलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासह महाराष्ट्रातल्या नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून यूजीसीला त्याबाबत माहिती द्यावी, असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय चित्रपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार पटकावला. एस्टोनियाच्या 'सावर मिल्क' या लघुपटानं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट पुरस्कार, तर पोलंडच्या झीमा या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशनपटाचा पुरस्कार पटकावला. जपानच्या लियाम लोपिंटो दिग्दर्शित 'द ओल्ड यंग क्रो' या चित्रपटाला दिग्दर्शनासाठीचा "प्रमोद पाटी पुरस्कार" देऊन गौरवण्यात आलं.

****

सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. राज्यसरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला यावेळी चिखल फासण्यात आला.

****

नांदेड जिल्‍हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय इमारतींमध्ये पर्जन्य जल पुनर्भरण अनिवार्य करण्याचं आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या २०९ इमारतीच्‍या कामांचं अंदाजपत्रक तयार असून, यामध्ये पर्जन्य जल पुनर्भरण करण्‍यात आली असल्याची माहिती करनवाल यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत - परभणी मार्गावर रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. काल संध्याकाळच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश दरम्यान सामना होणार आहे. अँटिग्वा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.

 

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...