Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रीय बालिका दिन आज साजरा होत आहे.
बालिकांना कोणत्याही भेदभावाचा सामना करावा लागू नये याबद्दल केंद्रसरकार
सुनिश्चितता बाळगत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना
बालिकादिनानिमित्त समाजमाध्यमावरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी ही
बाब स्पष्ट केली. बालिकांना सक्षमता प्रदान करणाऱ्या शिक्षण, तंत्रज्ञान,
कौशल्य विकास, आरोग्यसेवा अशा
क्षेत्रांवर केंद्रसरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
बालिकांना सक्षम बनवण्यासाठी तसंच त्यांना सक्षमीकरणासाठी अनेक संधी उपलब्ध करुन
देण्यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला. सर्वच
क्षेत्रात देशभरातल्या बालिका संपादित करत असलेल्या यशाबद्दल आपल्याला अभिमान असून
त्यांचं हे यश सर्वांना प्रेरित करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात
सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार
आदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. यंदा विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे ३१ चित्ररथ प्रजासत्ताक
दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची स्वर्णिम भारत - वारसा आणि
विकास अशी मध्यवर्ती संकल्पना आहे. राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन विशेष
चित्ररथही असणार आहेत. भगवान बिरसा मुंडा, सरदार
वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती, तसंच हवामान विभागाचा
दीडशेवा स्थापना दिन यांच्या निमित्तानंही चित्ररथ सादर होणार आहेत.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि
विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध
कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार
नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी
करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित
सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत.
****
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन
आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पा निमित्त शिरा महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. येत्या
एक फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, या अर्थसंकल्पाच्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून हलवा सोहळा दरवर्षी आयोजित केला
जातो. केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी तसंच वित्त मंत्रालयातील वरिष्ठ
अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
****
महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये उत्कृष्ट कार्य
केलेल्या अधिकाऱ्यांना उद्या पुण्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय मतदान दिन २०२५ चं औचित्य
साधून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, एम.आय.टी. विद्यापीठ, पुणे आणि जिल्हा निवडणूक
अधिकारी,
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय पुरस्कार
उद्या शनिवारी कोथरूड, पुणे इथे प्रदान करण्यात
येतील.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित या
कार्यक्रमात लोकसभा तसंच विधानसभा २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचं नियोजन, मतदान
साहित्य वाटप करून घेण्याचं नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या
अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी
एस.चोक्कलिंगम तसंच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी
कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील
नंदागौळ या छोट्या गावात जन्मलेले परळीचे भूमिपुत्र भरत गीते यांच्या टॉरल इंडिया
प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं दावोस इथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम -
जागतिक आर्थिक मंचच्या परिषदेत महाराष्ट्र
शासनाचे दोन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भरत गीते
यांच्या टॉरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा तसंच अहिल्यानगर
या ठिकाणी अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात
निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी ५०० कोटी
रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून १ हजार २०० पेक्षा अधिक रोजगारांची
याद्वारे निर्मिती होणार आहे. या यशस्वीतेबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भरत गिते आणि त्यांच्या संचाचं सामाजिक प्रसार
माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment