Saturday, 4 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      बालकांना कफ सिरप देण्यासंदर्भात केंद्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी

·      अनुकंपातत्वरील पाच हजार उमेदवारांसह दहा हजार उमेदवारांना आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान होणार

·      मातृभाषेसह इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा-मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

·      अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून तीन दिवस अंतिम संधी

·      सिंधुदूर्ग इथं आठ पर्यटक समुद्रात बुडाले-चौघांचा मृत्यू;इतरांचा शोध सुरू

·      अतिवृष्टीग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदतीचे प्रस्ताव तयार करा-मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

आणि

·      वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताकडे २८६ धावांची आघाडी

****

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं, कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या सूचनांनुसार, बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत. पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत, असं यात म्हटलं आहे.

****

अनुकंपातत्वरील गट क तसंच गट ड मधील पाच हजारावर उमेदवारांना आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या पाच हजारावर उमेदवारांनाही यावेळी नियुक्तीपत्रं दिली जातील.

छत्रपती संभाजीनगर इथं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संत एकनाथ रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात २९६ जणांना नियुक्तीपत्र दिली जातील. आज सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नांदेड इथेही आज आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात ७०, गट ‘ड’ संवर्गात २२२ आणि राज्य लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ६४ उमेदवारांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं दिली जाणार आहेत.

****

सांस्कृतिक उत्थानात भाषा ही महत्त्वाची असल्यामुळे स्वभाषा, मातृभाषा आणि इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्‌घाटन काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठीसाठी संसाधनांची कधीही कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले....

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती हाच उपाय, असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पोलिस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, त्यामुळे सायबर गुन्हे आणि फसवणूक झाल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना कराचं अग्रीम हस्तांतरण करण्यात आलं असून, त्यापैकी महाराष्ट्राला सहा हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. आज उद्या आणि परवा होणाऱ्या या अंतिम फेरीची विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असं आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केलं आहे.

****

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढवणं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ही समिती, दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहेत. शहा यांच्या उपस्थितीत आज आणि उद्या लोणी तसंच कोपरगाव इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाला काल ११ वर्षे पूर्ण झाली. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी 'मन की बात' चा पहिला भाग प्रसारित झाला होता. हा फक्त रेडिओ कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचं प्रतीक असलेला हा कार्यक्रम सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवाद स्थापित करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचं विष्णुदास भावे गौरवपदक यंदा प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झालं आहे. गौरवपदक, २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या रंगभूमीदिनी, पाच नोव्हेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात काल नऊ पर्यटक बुडाले. काल संध्याकाळी ही घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांना वाचवण्यात यश आलं.

उर्वरित चौघांचा शोध अद्याप सुरू आहे. यातले काहीजण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा अंदाज न आल्यानं न आल्यामुळे ते बुडाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात नांदुरा बुद्रुक इथले जटुरे ज्ञानोबा रामा हे पुरात वाहून गेले होते. चार दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते काल मृताच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला.

****

अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात सांडवा इथं नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांची त्यांनी काल भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. विभागात ३८५ तलाव असून, यापैकी ३३० तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

****

यावर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रात्यक्षिक स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबवण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खडकूत इथं या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. कर्डीले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, पद्धती आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांबाबत मार्गदर्शन केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात महापुरामुळे बाधित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परतत असून, जिल्हा प्रशासनाने मोफत धान्य वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. लाभार्थी कुटुंबांना १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ मोफत देऊन प्रशासनाकडून पुरग्रस्तांना दिलासा देण्यात येत आहे. सुमारे दोन हजार १७० कुटुंबांना धान्य वितरित करण्यात येणार आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या वेळी जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी शासनाला सादर करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जळगाव फेरण इथं शेतकरी कर्जमाफी हक्क यात्रेदरम्यान जाहीर सभा घेण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यावळी सरकारी धोरणांवर टीका केली.

****

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. शासनाने ३ हेक्टरपर्यंत अनुदानाची मर्यादा वाढवावी, खतं-बियाणं आणि औषधांचे दर कमी करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अहमदाबाद इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कालच्या ५ बाद ४४८ धावांवरून पुढे खेळ सुरू करेल. भारतीय संघाकडे पहिल्या डावात आतापर्यंत २८६ धावांची आघाडी आहे. काल खेळ थांबला तेव्हा रविंद्र जडेजा १०४ तर वाशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर संपुष्टात आला आहे.

****

नॉर्वे इथं सुरु असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल रौप्य पदक पटकावलं. ४८

किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच मध्ये ८४ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११५ असं एकूण १९९ किलो वजन उचलत ही

कामगिरी केली.

****

हवामान

राज्यात आज छत्रपती संभाजीनगर तसंच जालना वगळता उर्वरित मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 24 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 24 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...