Monday, 6 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन

·      सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- मुख्यमंत्र्यांची ग्वाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांनी नफ्यातून २५ लाख रुपये देण्याचे निर्देश

·      एसआर-13 प्रकारच्या कफ सिरपवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी

·      लातूर, धाराशिव तसंच नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

आणि

·      महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ८८ धावांनी विजय

****

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. महाराष्ट्र सरकारने सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर तात्काळ मदत दिली जाईल, असं शहा म्हणाले,

बाईट- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन शहा यांनी केलं.

प्रवरानगर इथं डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा शहा यांच्या उपस्थितीत झाला, तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. याशिवाय देशातला पहिला सहकारी कॉम्प्रेस बायो गॅस प्रकल्प आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचं उदघाटन देखील शहा यांच्या हस्ते झालं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. 

**

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. साखर कारखान्यांना त्यांच्या नफ्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्य शासनाने नदीजोड प्रकल्प राबवण्याचा आणि त्यातून राज्यातला दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्याटप्प्यानं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक,अहिल्यानगर परिसर आणि  मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल, असं कार्य राज्य शासन करेल, असं त्यांनी नमूद केलं.

सहकार मंत्रालयाने साखर उद्योगात पारदर्शकता आणली; जुन्या परंपरा आणि नव्या संशोधनाची सांगड घालून सहकार चळवळ मजबूत केल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, तर महाराष्ट्राला साखर कारखानदारीने समृद्ध केलं, अडचणीत आलेला साखर उद्योग अमित शहा यांनी वाचवला; उसाला आणि साखरेला चांगला भाव मिळाला, असं अजित पवार यांनी नमूद केलं. 

****

श्री गुरु गोविंद सिंह जी नांदेड विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकृत देखरेखीखाली चालवलं जाणार आहे. शिर्डी आणि अमरावतीनंतर, हे आता महाराष्ट्र सरकार चालवणारं तिसरं विमानतळ ठरलं आहे. हा टप्पा व्यापार, पर्यटन आणि रोजगार यांसाठी महत्वाचा असून, मराठवाड्याच्या विकासाला नवीन गती मिळेल, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्यासाठी आभार मानले. 

****

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेत या सुधारणांमुळे कशा प्रकारे सकारात्मक बदल झाले, याविषयी जाणून घेऊ.

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेत या सुधारणांमुळे कशा प्रकारे सकारात्मक बदल झाले, याविषयी जाणून घेऊ.

जीएसटी सुधारणांचा राज्याला मोठा फायदा होणार आहे. कापूस आणि वस्त्रोद्योग हे राज्यातलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. मराठवाड्याच्या काही भागासह लगतच्यां सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग केंद्रं आहेत. धागे आणि कपड्यांवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के केल्यामुळे कच्च्या मालाच्या खर्चात सुमारे सहा ते सात टक्के बचत होण्याची शक्यता आहे. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला  थेट लाभ मिळेल. पैठण इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांनी या जीएसटी कर कपातीबद्दल या शब्दांत आपलं मत व्यक्त केलं.

राज्यातलं ऑटोमोटिव्ह आणि ऑटो कंपोनंट्स क्षेत्र फक्त देशाच्या वाहन उत्पादन क्षेत्रातच महत्त्वाचं स्थान राखत नाही, तर शहरीकरण आणि आर्थिक विकासालाही चालना देतं. जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आल्याने लहान कार, ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी आणि ऑटो पार्ट्सच्या करात कपात झाली आहे. या बदलामुळे वाहन आणि स्पेअर पार्ट्सच्या किमतीत मोठी घट अपेक्षित आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातल्या अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. GST सुधारणांमध्ये हॉटेल रूम्स च्या भाड्यावरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के केल्यानं पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी इथलं वास्तव्य तुलनेने  स्वस्त होईल.

याशिवाय संरक्षण उत्पादन, औषधनिर्मिती, आर्थिक सेवा आणि विमा, चित्रपट आणि मनोरंजन उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र, नवीकरणीय ऊर्जा उपकरणं आदी क्षेत्रातही जीएसटी कपातीमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे.

ही नवीन कररचना ग्राहकांची खरेदी क्षमता वाढवत आहेच, शिवाय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करत आहे.

****

कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोल्र्डिफ सिरप नावाचं औषध विकणे, वितरीत करण्यावर तत्काळ बंदी घातली आहे. या कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी घटक भेसळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या औषधाच्या एस आर 13 या बॅचचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून, या औषधाचा साठा स्थानिक औषद नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्युल ‘एम’ चं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित केलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारने केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पिकांचं मोठं नुकसान झालं असून, त्याचं सविस्तर मूल्यांकन आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.

****

लातूर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी काल पुन्हा पाऊस झाला. लातूर तालुक्यात मुरुड परिसरात काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला असून, शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. सोयाबीन, ऊस आणि अन्य काही पिकांचंही नुकसान झालं असून, काही भागातल्या जमिनी देखील वाहून गेल्या. मुरुड ते वाठवडा, मुरुड ते पाडोळी मार्गे कळंब च्या दिशेने जाणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती.

दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल जळकोट तालुक्यातल्या तिरुका इथं तिरु नदी काठावरच्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जाऊ नये, या संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

निलंगा तालुक्यात मसलगा सिंचन प्रकल्पाच्या खचलेल्या भिंतीची देखील भोसले यांनी पाहणी केली. याठिकाणी दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना त्यांनी दिली.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल रेणापूर तालुक्यात डिगोळ देशमुख इथं नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. राज्य सरकारच्या मंत्री समितीने पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून पंधरा रुपये कपातीचा घेतलेल्या निर्णयाची तसंच शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पाठवलेल्या नोटिसांची होळी शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यातही पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. कळंब, भूम, धाराशिव आणि वाशी तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

नांदेड जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विभागात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सुरु झाल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून नऊ हजार ४३२, माजलगाव धरणातून दहा हजार २५, येलदरी धरणातून सहा हजार ९२०, तर उर्ध्व मानार प्रकल्पातून चार हजार ८५९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

****

मराठवाडा तसंच विदर्भ विभागात, उद्या सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकांत सर्वबाद २४७ धावा केल्या. हर्लिन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला पाकिस्तान महिला संघ ४३ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. तीन बळी घेणारी क्रांती गौड सर्वोत्तम खेळाडू ठरली. 

****

No comments: