Wednesday, 8 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 08.10.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारतीय हवाई दलाचा ९३ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. आठ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापन झालेल्या हवाई दलाने हवाई शक्तीचं एक असं स्वप्न साकारलं ज्याने येणाऱ्या दशकांसाठी देशाच्या संरक्षण क्षेत्राला आकार दिला.

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शूर हवाई योद्ध्यांना पुष्पांजली अर्पण केली. हवाई दल प्रमुखांनी याठिकाणी अभ्यागत पुस्तिकेत एक संदेश लिहिला, ज्यामध्ये भारतमातेच्या शूर सुपुत्रांच्या धैर्य, त्याग आणि समर्पणाला आदरांजली वाहण्यात आली. हवाई दलाच्या स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम गाझियाबाद इथल्या हिंडन हवाई तळावर पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हवाई योद्धे, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना हवाई दल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हवाई दलानं आपल्या सामर्थ्यानं प्रत्येक आव्हानाला तोंड देत देशाचा गौरव वाढवल्याचं, त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

नवी दिल्लीत ९व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हा आशियातला सर्वात मोठा दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञान कार्यक्रम आहे. “परिवर्तन घडवण्यासाठी नवोन्मेष” ही यावर्षीच्या या कार्यक्रमाची संकल्पना आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या काँग्रेसमध्ये १५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, तर ४०० पेक्षा जास्त आघाडीच्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 6G तंत्रज्ञान, क्वांटम कम्युनिकेशन्स, ऑप्टिकल नेटवर्क्स, सेमीकंडक्टर्स आणि सायबर फसवणूक प्रतिबंध, आदी विषयांवर यामध्ये चर्चा होणार आहे.

****

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौर्यावर असून, आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्मर यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत.

****

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी काल ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय ॲपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवहार युपीआय द्वारे करता येतील. याची सुरुवातही त्यांनी केली. ग्राहकांना सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करता यावे यासाठी सेबी आणि एन पी सी आय यांनी वैध यूपीआय आणि सेबी चेक सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

****

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या २५ वर्षांत उल्लेखनीय प्रगती झाली असून, २५ हजार कोटी रुपयांवरुन हा उद्योग आता अडीच लाख कोटी रुपयांवर गेला असल्याचं, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी काल मुंबईत सांगितलं. रौप्यमहोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. फिक्की फ्रेम्स आणि मराठी चित्रपटातला संबंध वाढवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत दिलं. वेव्ह्ज ओटीटी हा मंच सर्व प्रकारच्या भारतीय कंटेंटसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ आहे, अशी माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी दिली.

****

एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं. काल मुंबईत एसटी कामगार संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कामगारांचे महागाई भत्ते, घरभाडे भत्ता आणि अन्य थकीत भत्ते, तसंच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं सरनाईक यांनी सांगितलं.

राज्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक सेवांसाठी नवीन धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचं सरनाईक यांनी अन्य एका बैठकीत सांगितलं.

****

राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता चिमुकल्यांचे हात पुढे सरसावले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या परिवर्धे इथल्या शालेय विद्यार्थ्यांनी साठवलेले खाऊचे पैसे शेतकऱ्यांच्या मदतनीधी साठी दिले आहेत. या विद्यार्थ्यांनी पाच हजार १६३ रुपयांची मदत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपुर्द केली.

****

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तपदी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.

****

तुळजापूर इथं अश्विन पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विषयावरच्या या प्रदर्शनाला सुमारे दहा लाख भाविकांनी भेट दिली.

****

No comments: