Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
भारत
आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार-पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त
·
तंबाखूमुक्त
युवा मोहिमेच्या साठ दिवसांच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
·
दहशतवाद
विरोधी पथकाचे पुण्यात छापे
·
आणि
·
महिला
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय
संघाची पडझड
****
भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक
स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केला आहे. ते आज मुंबईत फिन्टेक फेस्टमध्ये ब्रिटनच्या समावेशाच्या अनुषंगाने बोलत
होते. फिन्टेकच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना मोदी म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान,
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर
यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर,
दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्तपणे
पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि युनायटेड किंग्डम नैसर्गिकरीत्या भागीदार असून
लोकशाही, स्वातंत्र्य
आणि कायद्याचं राज्य, या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं
मोदी यांनी नमूद केलं. युक्रेन-रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने
तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीत संयुक्त आर्थिक आणि
व्यापार समितीच्या पुनर्स्थापनेसाठी अटीशर्तीवर स्वाक्षरी झाल्याचं वाणिज्य आणि
उद्योजकता मंत्री पीयूष गोयल यांनी समाजमाध्यमावर सांगितलं. यामुळे भारत-ब्रिटन
मुक्त व्यापार कराराला चालना मिळेल असं गोयल यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा
शनिवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळी क्षेत्रात
आत्मनिर्भरतेसाठीच्या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण
मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. गहू आणि तांदूळ
उत्पादनाप्रमाणेच देश आता डाळी उत्पादनातही स्वयंपूर्ण होईल असा विश्वास चौहान
यांनी व्यक्त केला. उत्पादकता वाढवणं, पीक वैविध्याला प्रोत्साहन देणं तसंच सिंचन आणि
साठवणूक सुधारणं ही या योजनेची उद्दीष्टं असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या
तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल
यांनी आज केला. या साठ दिवसांच्या राष्ट्रीय मोहिमेचं उद्दिष्ट मुलांना, तरुणांना तंबाखू सेवन टाळण्यासाठी
शिक्षित करणं तसंच तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देणं, हे आहे. यावेळी अनुप्रिया पटेल
यांनी विद्यार्थ्यांना "तंबाखूला नकार द्या" अशी शपथ दिली. तसंच ही
मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या –
बाईट - अनुप्रिया पटेल, राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण
****
भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय
लोकशाहीसाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे
यांनी केलं आहे. जर्मनीत बार्बाडोस इथं सुरु असलेल्या अडुसष्टाव्या राष्ट्रकुल
संसदीय संघटना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल
परिवर्तनाद्वारे लोकशाही वाढवणं आणि डिजिटल दरी दूर करणं’
या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत
होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यशाळेत ऑनलाइन सहभाग घेत, मार्गदर्शन केलं.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या
प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले
आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवर
चुकीची, बनावट
आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर आयोगाने
बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफीत अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
केला असल्यास, त्यावर
तशी नोंद करणं बंधनकारक असेल, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत
निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे. या
यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या
कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. १ जुलै २०२५ रोजी विधानसभा मतदार यादीत नाव
असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
****
पुण्यात दोन औषध कंपन्यांमधून १३
लाख रुपयांचा प्रतिबंधित कफ सिरपचा साठा जप्त करण्यात आला आहे. या सिरपमध्ये
‘डायथिलीन ग्लायकॉल’ हे रसायन प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचं अन्न आणि औषध
प्रशासनाचे औषध नियंत्रक डी.आर. गहाणे यांनी सांगितलं. हे कफ सिरप वितरणासाठी प्रतिबंधित
केल्याची माहिती गहाणे यांनी दिली.
****
पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवाद
विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या १९ ठिकाणांवर छापे टाकले. काल रात्री
बारा वाजल्यापासून ही कारवाई सुरु करण्यात आली,
या प्रकरणी चौकशी केल्यानंतर काही महत्त्वाचे
पुरावे जप्त केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. पुण्यासह पिंपरी चिंचवड भागात
अद्याप संशयितांची चौकशी सुरू आहे. २०२३ मधील कार्यवाही मध्ये आढळलेल्या
आरोपींच्या चौकशी मधून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम
राबवली जात असल्याचं एटीएस कडून सांगण्यात आलं आहे.
****
वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर
महाराजांनी पाया रचला, तुकाराम महाराज कळस झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे
या कळसावरील ध्वज असल्याचं मत, लक्ष्मणदास काळे महाराज यांनी व्यक्त केलं आहे. तुकडोजी
महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अमरावती इथं गुरुकुंज मोझरी
आश्रमात कीर्तन संमेलनाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. तुकडोजी महाराजांच्या
साहित्यावरून, वारकरी
संप्रदाय तसंच गुरुदेव सेवामंडळ वेगवेगळे नसून ते एकच असल्याचं सिद्ध होतं, असंही काळे महाराज यांनी नमूद
केलं.
****
मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे
चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे.
त्यामुळे आता प्रवाशांना आरे जेव्हीएलआर या उपनगरातल्या मेट्रो स्थानकापासून ते कफ
परेड असा संपूर्ण प्रवास करता येणार आहे. या मेट्रोसेवेचं नाव ॲक्वा लाईन असं आहे.
आज सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड
अशा दोन्ही स्थानकांतून रवाना झाली. तर रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३च्या अखेरच्या
टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
****
क्रिकेट
महिला क्रिकेटमध्ये, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत
विशाखापट्टणम् इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय
संघाची पडझड सुरू आहे. भारताच्या सहा बाद १०२ धावा झाल्या आहेत. दक्षिण अफ्रिका
संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या प्रतिका
रावल, स्मृती
मंधाना आणि हर्लिन देओल वगळता एकही महिला फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकलेला नाही.
****
महिला तसंच बालकांच्या सर्वांगीण
विकासासाठी महिला आणि बालकांचे हक्क-कल्याण समिती कटिबद्ध असल्याचं समितीच्या
प्रमुख मोनिका राजळे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील महिला कारागृह, सुधारगृह तसंच काही संस्थांना भेट
देऊन राजळे यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांना रोजगाराभिमुख
प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वास समिती सदस्यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून महिनाभर मानसिक आरोग्य सेवा यावर विशेष जनजागृती
मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत
सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय
धानोरकर यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘आपत्ती आणि
आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता’ ही संकल्पना
निश्चित करण्यात आली आहे.
****
शेतकऱ्यांना पिकविम्याची योग्य आणि
वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पिकविमा कंपनीने समन्वयाने
कामं करण्याच्या सूचना परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या
आहेत. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप आणि निधी मागणीसंदर्भात आज
झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या
बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला, यावेळी एकही तक्रार येणार नाही याची विमा कंपन्यांनी दक्षता
घ्यावी असे निर्देश बोर्डीकर यांनी दिले.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट
इथल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना
५० लाख रुपयांपर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. यामध्ये जवळपास
५ हजार धान्य शिधा किट तसंच १ हजार महिलांना साडी चोळीचे वाटप केलं जाणार असल्याचं
मंडळातर्फे सांगण्यात आलं.
****
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर
झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आज मूक मोर्चा
काढण्यात आला. लाल फिती लावून वकीलांनी शांततेत आपला निषेध नोंदवला.
****
हवामान
राज्यात आज सातारा, सांगली,
कोल्हापूर तसंच सिंधुदूर्ग
जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment