Thursday, 9 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत राजभवनात ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचं स्वागत केलं. दोन्ही नेते भारत-ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीचा व्हिजन २०३५ अंतर्गत आढावा घेणार असून, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणाऱ्या सहाव्या जागतिक फिनटेक महोत्सवात पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांचं बीजभाषणही आज होणार आहे.

****

देशभरात आजपासून तंबाखूमुकत युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे ही मोहिम राबवत आहे. तंबाखूमुक्त पिढी तयार करण्याचं केंद्र सरकारचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन महिने सुरु राहणार्या या मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजूषा स्पर्धा, समुपदेशन यासह विविध उपक्रम आयोजित केले जातील.

****

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे. या शस्त्रज्ञांनी रेणूंचा नवा आराखडा तयार केला, यामुळे वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं, पाण्यातून प्रदूषित घटक काढणं यासारख्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतून राज्यातल्या ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाचं उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन युवाशक्तीला आजच्या व्यवसायांसाठी सज्ज करणं, हे आहे. याअंतर्गत राज्यभरातल्या विविध संस्थांमध्ये फॅशन डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, सौंदर्य थेरपीसारखे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय मंडळातर्फे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

****

कोणतंही औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी होईल याची दक्षता घ्यावी आणि संबंधित उपाययोजना कराव्या, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या औषध नियंत्रकांना दिले आहेत. मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे अलीकडे झालेल्या बालकांच्या मृत्यूप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहे.

****

खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या मुद्द्यांवर महावितरणमधल्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आजपासून तीन दिवस संप पुकारला आहे. संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झालं असून, राज्यभरातली यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची कोणताही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम - मेस्मा लागू केला असून, संप करणाऱ्या कर्मचार्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

****

महाराष्ट्राच्या यंदाच्या हंगामात साडेबारा लाख हेक्टर क्षेत्रात उसाचं पीक झालं असून, त्यामधून साधारण ११० ते ११५ लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन २५ ते ३० लाख मेट्रिक टन अधिक होण्याचा अंदाज असून, देशात साडेतीनशे लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांनी दिला आहे.

****

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण अंमलात आणण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व संबंधित घटकांशी विस्तृत चर्चा करणार असून, जनमत जाणून घेण्यासाठी तसंच सूचना एकत्रित करण्यासाठी त्रिभाषा समिती डॉट महा आयटी डॉट ओआरजी या संकेतस्थळावर एक प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरीकांनीही या संकेतस्थळाला भेट देऊन आपलं मत आणि सूचना नोंदवाव्यात असं आवाहन राज्याच्या प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर यांनी केलं आहे.

****

अंमली पदार्थ तस्करीच्या एका प्रकरणात ईडीच्या पथकानं काल मुंबईत आठ ठिकाणी छापे टाकले. फैझल जावेद शेख आणि अल्फिया शेख यांच्यासह इतरांवर हे छापे टाकल्याचं वृत्त आहे.

****

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शून्य अपघाती मृत्यू जिल्हा या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल घेतलेल्या बैठकीत दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता कार्यालय तसंच देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. यात ८७ उमेदवारांची निवड झाली असल्याची महिती कौशल्य विकास आणि रोजगार अधिकारी सुरेश बहुरे यांनी दिली.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 31 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...