Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
यावर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे छपन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपयांची
मदत वितरीत करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद
जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
****
भारताचं स्वदेशी लढाऊ विमान तेजस एमके - वन ए आज भारतीय
वायुदलाला सुपूर्द करण्यात आलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नाशिकमधल्या
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड केंद्रात हा कार्यक्रम सुरु आहे. तेजस एमके - वन ए हे
तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टची सुधारित आवृत्ती असून, यात अत्याधुनिक रडार, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, आणि हवेत असतानाच इंधन भरण्याची क्षमता आहे. हे विमान ताशी दोन
हजार २०० किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतं. हा टप्पा आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संरक्षण
तंत्रज्ञानाच्या बळकटीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. बंगळुरु इथं तेजस उत्पादनाचे
दोन प्रकल्प याआधीच सुरु असून, नाशिकमधला हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे.
****
छत्तीसगढ राज्यात जगदलपूर इथं आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण
केलं. यात ९८ पुरुष आणि ११० महिलांचा समावेश आहे. नक्षलवाद निर्मूलनाच्या दिशेनं हे
मोठं यश आहे. हिंसेचा मार्ग सोडत, आपल्याजवळची १५३ हत्यारं खाली टाकत या नक्षलवाद्यांनी समाजाच्या
मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना आता सरकारच्या पुनर्वसन योजनांचा लाभ मिळणार आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात अपक्ष आमदार
आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी पाच वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व
केलं. सध्या ते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवत होते. २०२४च्या विधानसभा
निवडणुकीत कर्डिले यांनी मोठा विजय मिळवला होता. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात
त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या
राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता.
आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी जोडलेलं, तळागाळातल्या घटकांच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व हरपलं, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना
श्रद्धांजली वाहिली आहे. तर कर्डीले यांच्या निधनानं एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व
हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
आज वसुबारस. सवत्स धेनू अर्थात गायवासराच्या पूजेनं दिवाळीला
आजपासून प्रारंभ होतो. शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखा मेहनती पशू देणाऱ्या
गायीप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दीपोत्सवाचा
आरंभ होताना वसुबारसेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यमाता गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त
करत, गाय आणि वासराच्या नात्यातलं ममत्व, मांगल्य आणि समृद्धी आपणा सर्वांना लाभो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं
आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही वसुबारसेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत
आज सायंकाळी सवत्स धेनू पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, त्यांच्या दु:खात सहभाही होऊन, आजचा दिवस दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाने घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती इथं पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय कमी असल्याचं सांगून त्यांनी, सरकारवर टीका केली.
****
राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या
शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने
मान्यता दिली असून, तीन नोव्हेंबर ते ३१
डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. २०२५-२६ मध्ये हे स्पर्धात्मक
अभियान काही नवीन उपक्रमांसह राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये
विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके
दिली जाणार आहेत.
****
बीड इथल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं दिवाळीनिमित्त उद्या धनत्रयोदशीला सकाळी
बालकलावंताची सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment