Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
दीपावलीच्या पर्वात आज नरकचतुर्दशी
साजरी होत आहे. आज पहाटे घरोघरी अभ्यंगस्नानाचा सोहळा पार पडला. नरक चतुर्दशीनिमित्त
धाराशिव इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे चरणतीर्थ, श्री भवानीमातेला अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान आणि अभिषेक, धुपारती आदी कार्यक्रम पार पडले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती
सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल आचार्य देवव्रत
यांनी दीपावली निमित्त देसवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंध:कारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान तसंच वाईटावर चांगुलपणाच्या
विजयाचं प्रतीक असून अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतिक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये
उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या
आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येवो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालय घाटीचा बाह्य रूग्ण विभाग उद्या लक्ष्मीपूजन आणि २३ तारखेला भाऊबीजेनिमित्त
बंद ठेवण्यात येणार आहे. इतर दिवशी नियमित सेवांसह आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार
आहेत, घाटी प्रशासनाच्या वतीने कळविण्यात
आलं आहे.
****
दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी दिवाळी पहाट हा शास्त्रीय संगीताचा
कार्यक्रम करण्याची परंपरा छत्रपती संभाजीनगर इथल्या सांस्कृतिक संस्थांकडून पार पाडली
जाते. छत्रपती संभाजी नगर इथल्या शास्त्रीनगर परिसरात पंडित शौनक अभिषेकी यांचा दिवाळी
पहाट कार्यक्रम झाला. अभिषेकी यांनी शास्त्रीय गायनासह सादर केलेल्या अभंगांना, भावगीतांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद
लाभला.
****
आनंदाचं आणि उत्साहाचं पर्व असलेल्या
दिवाळीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची
आतषबाजी करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक असून सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या
विद्युत उपकरणांपासून सावध राहावं आणि
विद्युत सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलं आहे.
दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत
उपकरणांपासूनदेखील सावध राहावं, दर्जेदार उत्पादनं वापरावीत, घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून
सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे
लावावेत. विद्युत वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून फटाके
फोडताना सुरक्षित अंतर ठेवावं आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक विद्युत यंत्रणेला
आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं महावितरणने म्हटलं आहे. विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण
कार्यालयाच्या १९१२ या टोल फ्री क्रमांकाशी तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन महावितरणने केलं आहे.
****
दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी
गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगाराकडून जादा बसेसचं नियोजन
केलं असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन
क्षीरसागर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरातलं मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको
बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कमी उत्पन्न असलेल्या आणि कमी वर्दळ
असलेल्या बसेस गर्दीच्या ठिकाणी वळवण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महा
अभियान या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महिला आणि बालविकास मंत्रालयाला काल
विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्याकडून मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हा सन्मान नवी दिल्लीतील
विज्ञान भवन इथं आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित ‘आदी कर्मयोगी अभियान’ राष्ट्रीय
संमेलनादरम्यान प्रदान करण्यात आला. या सन्मानाद्वारे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या
‘विकसित भारत २०१७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे.
पीएम जनमन योजनेअंतर्गत विशेषतः असुरक्षित
आदिवासी गट क्षेत्रांमध्ये २ हजारां हून अधिक
अंगणवाडी केंद्रं सुरू करण्यात आली असून त्यामुळे अंतिम टप्प्यावरील आदिवासी समाजाच्या
सक्षमीकरणास चालना मिळाली.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक
विकासासाठी राज्यसरकार कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना
थेट लाभ पोहचवण्याचा उपक्रम याचंच द्योतक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रधानमंत्री खनिज
कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने
ई-रिक्षा आणि इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभात काल ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील १ हजार महिला
बचत गटांना व्यवसायासाठी प्रतीगट १ लाख रूपयांचा निधी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी वितरित करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment