Tuesday, 21 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आज लक्ष्मीपूजनाचा सोहळा

·      भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल - पंतप्रधानांना विश्वास; आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी

·      महाराष्ट्राचं 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचं स्वप्न साकारणार - मुख्यमंत्र्यांची माहिती; विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता

·      ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची भूमिका ठाम - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

·      ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

आणि

·      तुळजापूर इथं श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव साजरा

****

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बाजारपेठा, घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत. सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून, घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त आज मुंबईच्या शेअर बाजारांमधे मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणेतीन या वेळात होणार आहेत. राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे, त्यादृष्टीने आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही राबवले जात आहेत.

दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या शास्त्रीनगर परिसरात पंडित शौनक अभिषेकी यांचा दिवाळी पहाट कार्यक्रम काल झाला. अभिषेकी यांनी शास्त्रीय गायनासह सादर केलेल्या अभंगांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं सांगत त्यांनी, नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं, तसंच सैन्यदलाच्या सामर्थ्याचा गौरव केला. भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असंही पंतप्रधान म्हणाले. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक असून, ही केवळ एक युद्धनौका नाही, तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्राचं 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचं स्वप्न साकारणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा 'रोडमॅप' दिला आहे. यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी. राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारं शाश्वत विकासाचंच मॉडेल निर्माण करावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची भूमिका ठाम आहे, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ठ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, हैद्राबाद गॅझेट हे केवळ मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतं लागू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा-कुणबी समाजाला त्याचा लाभ होणार नाही, त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करु नयेत, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.

****

दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यातल्या ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली. यामध्ये २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी, तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवडश्रेणी मिळालेल्या अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला.

****

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामं केली जातात.

****

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. विनोदी अभिनेते म्हणून ओळख असलेले जाणारे आसरानी यांची, 'शोले' चित्रपटात जेलरची भूमिका, आणि 'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं' हा त्यांचा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला. असरानी यांनी 'धमाल', 'ढोल', 'बालिका वधू', 'हेरा फेरी', 'मालामाल विकली' आदी चित्रपटांमध्ये काम केलं. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. असरानी यांनी फॅमिली ४२० सारख्या मराठी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. त्यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांच्या निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रासह सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.

****

राज्याचे माजी मंत्री महादेव शिवणकर यांचं काल गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थखात्याची जबाबदारी सांभाळली होती. गोंदिया जिल्हानिर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

****

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत अशा शेतकऱ्यांना १७८ कोटी रुपयांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यास मान्यता देण्यात आली, तर, सुमारे एक लाख ८२ हजार शेतक-यांच्या खात्यांमध्ये १४१ कोटी पंधरा लाख रुपये अनुदान जमा करण्यात आलं. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानासाठी शासनानं हिंगोली जिल्ह्यासाठी २३१ कोटी २७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

****

श्री क्षेत्र तुळजापूर इथं काल सायंकाळी नरक चतुर्दशी आणि दर्श अमावस्येच्या मुहूर्तावर पारंपरिक श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव साजरा झाला. प्रथम भैरवनाथाचं विधिवत पूजन करुन भैरवनाथाच्या कड्यावर पारंपरिक भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. ही पेटलेली भेंडोळी श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात आणणयात आली. या पारंपरिक विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

****

नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब  इथं परंपरेनुसार तख्त स्नान सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला.

****

हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं नागरिकांना ‘फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत काल हिंगोलीच्या नगर परिषद कार्यालयात याबाबत एक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय, प्लास्टिकविरहित, ऊर्जा-बचतीची आणि स्वच्छतेचा संदेश देणारी दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही या कार्यक्रमातून करण्यात आलं.

****

दिवाळी सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसंच २३ तारखेला भाऊबिजेच्या दिवशी बंद राहणार आहे. इतर दिवशी नियमित सेवांसह आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार असल्याचं घाटी प्रशासनानं कळवलं आहे.

**

छत्रपती संभाजीनगर इथला मोंढा २३ ते २६ आक्टोबर दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती दि जनरल किराणा मर्चंट असोशिएशचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी दिली. यामुळे कामगार, हमालांना या सुटीचा लाभ मिळणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध संस्था, संघटना तसंच शाळांच्या वतीनं दिवाळीनिमित्त किल्ला बनवा स्पर्धा सुरू आहेत. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ओंकार विद्यालयाचे नागेश जोशी यांनी सांगितलं. शहरातल्या हेरंब गणपती मंदिर परिसरात स्वयंम फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत अनेक कुटुंबांनी सहभाग घेत, विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या.

****

दिवाळीचा सण शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी लातूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी पोलिस रेकॉर्डवरच्या सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये शस्त्रं बाळगणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेनं कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट कर संकलन प्रणाली, ही मोबाइल व्हॅन सेवा सुरू केली आहे. विविध कर सवलतींची प्रसिद्धी आणि प्रचार करणा-या या व्हॅनचा काल शुभारंभ करण्यात आला.

****

No comments: