Wednesday, 22 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      दीपावलीच्या प्रकाशपर्वातला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचा सर्वत्र उत्साह

·      वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारताची नवव्या स्थानावर झेप

·      ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन

आणि

·      लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन तर्फे बियाण्यांचं वाटप

****

दीपावलीच्या प्रकाशपर्वातला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, हा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. विक्रम संवत २०८२ पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही आज झाला. पती-पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट, फराळ आणि खरेदीची लगबग दिसत आहे. व्यापारी वर्ग आजच्या दिवशी नववर्षाची सुरुवात करून नवीन वह्यांचं पूजन करतो. काही भागांत बळी पूजन, तर उत्तरेत गोवर्धन पूजेचा आणि अन्नकूट परंपरेचा सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा होतो.

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथल्या जगप्रसिद्ध गंगोत्री धामचे पवित्र दरवाजे आज सकाळी अन्नकुट उत्सवानिमित्त बंद करण्यात आले. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या मंदिराला यावर्षी साडे सात लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या सराफा बाजारात सोनं खरेदी, तसंच कापड, दुचाकी, चारचाकी, घरगुती तसंच इलेक्ट्रानिक साहित्य खरेदीसाठी आज पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

****

भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंग उद्या या परिषदेला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होणार आहे. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षास्थितीचा आढावा घेतील. लष्कर, हवाईदल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयाने हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करणं हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.

****

भारतानं वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेनं ही जागतिक क्रमवारी जाहीर केली. सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक मिळाला होता. यंदा त्यात सुधारणा झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. वन संरक्षण, वनीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचं हे यश असल्याचं ते म्हणाले.

****

उडान योजनेला आज नऊ वर्ष पूर्ण झाली. २०१६ मध्ये राष्ट्रीय हवाई वाहतूक धोरणाअंतर्गत या योजनेला सुरुवात झाली होती. या काळात तीन लाख तेवीस हजाराहून अधिक विमान उड्डाणांद्वारे सुमारे एक कोटी ५६ लाखांहून अधिक प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी सोपा आणि परवडणारा करणं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

****

देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता २०१४ मध्ये ३५ गिगावॅट्स होती, ती आता पाचपटींनी वाढून १९७ गिगावॅट्सवर पोहोचली आहे. यात मोठ्या जलऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण झालेल्या ऊर्जेचा समावेश नाही. २०३० पर्यंत बिगरजीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅट्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या अपील न्यायालयानं आज फेटाळली. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. त्याचं नागरिकत्व हा त्याच्या भारतात प्रत्यार्पणात अडथळा नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला. मेहुल चोकसीची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता त्याच्यासमोर बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तो जर अयशस्वी झाला, तर बेल्जियम सरकार त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करेल. भारतात आल्यानंतर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचा सामना त्याला करावा लागेल.

****

या महिन्याच्या तेरा ते सतरा तारखांदरम्यान देशभरात पार पडलेल्या सीपीआर जागरूकता सप्ताहात देशभरातल्या सहा लाख सहा हजारांहून जास्त नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली. सीपीआर अर्थात कार्डिओपल्मनरी रिसुसायटशन ही एक आपात्कालीन जीवरक्षक प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीचा श्वास किंवा हृदय थांबल्यास ही प्रक्रिया करून त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. माय जीओव्ही तसंच माय भारत सह इतर अनेक माध्यमातून केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहा लाखांहून जास्त नागरिकांनी भाग घेतल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यभरात ३६५ दिवसांत १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. या विभागाच्या वतीनं आज मुंबईत मुलुंड इथं "दीप उत्सव दिवाळी पहाट" हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्ती वेतन संदर्भात त्रुटींचे निराकरण करण्याचं आश्वासन दिलं.

****

ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. डॉ. होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातला इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यातही चिटणीस यांनी मोलाची भूमिका बजावली. १९७० च्या दशकापासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

लातूर जिल्ह्यात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन तर्फे रब्बी हंगामासाठी हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथून या वाटपाची सुरुवात करण्यात आली. अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी नाम फाउंडेशन काम करणार असून, लातूर जिल्ह्यात हरभरा आणि ज्वारी बियाण्याच्या दोन हजार पिशव्या वाटणार असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथले दिव्यांग रवींद्र इंगळे यांनी स्वदेशीचा नारा देऊन स्वत: तयार केलेल्या पणत्या, वाती विकण्याचा व्यवसाय सुरु केला. भारतीयांनी स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला. यामधून मिळणाऱ्या नफ्यामधून काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहितीही इंगळे यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत -परभणी मार्गावर तेलगाव फाट्याजवळ कार आणि ऑटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्री हा अपघात झाला. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं दसरा, दिवाळी आणि छट पूजेचा उत्सव लक्षात घेत २७३ रेल्वे गाड्या वाढवल्या असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रेल्वेचा नांदेड विभाग प्रवाशांकडे विशेष लक्ष देत असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. गर्दीचं नियोजन करण्यासाठी विशेष वॉर रूम उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे प्रवासाबाबत कोणतीही तक्रार असेल तर प्रवासी, एक तीन नऊ, या क्रमांकावर ती तक्रार नोंदवू शकतात, असं कामले यांनी सांगितलं.

****

ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत नीरजला या मानद पदकाचं चिन्ह प्रदान केलं. संरक्षणमंत्र्यांनी यावेळी बोलताना, नीरज चोप्रा हे, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रीय अभिमानाच्या सर्वोच्च आदर्शांचं मूर्त रूप असून, ते क्रीडा जगत आणि सशस्त्र दलांसाठी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार काढले.

****

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान खात्यानं आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

****

No comments: