Wednesday, 22 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह; रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी

·      यंदा नवरात्रीपासून विविध वस्तूंच्या खरेदीत २५ टक्के वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सर्वेक्षणात स्पष्ट

·      अतिवृष्टी, पुरामुळे बाधित राज्यातल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार

·      पोलिस स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पोलिसांना अभिवादन

·      दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमात बीड जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक

आणि

·      राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

****

दीवाळीच्या मंगल पर्वात काल सर्वत्र लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडलं. घरोघरी चलनी नोटा-नाण्यांसह, देवी लक्ष्मीच्या प्रतिमेचं आणि नवीन झाडूचं पूजन झालं. रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता. शिर्डीच्या साईबाबा संस्थानात साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात आलं. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात काल मुहूर्ताच्या सौद्यांचं सत्र झालं.

आज साडेतीन मुहूर्तापैकी एक दीपावली पाडवा साजरा होत असून, सोनं-चांदी खरेदीसाठी उत्साहाचं वातावरण असतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे. संकटांनी घेरलेल्या जगात, स्थैर्य आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून भारताचा उदय झाल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली. याशिवाय, यावर्षीची दिवाळी खास आहे कारण, पहिल्यांदाच, देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये दिपोत्सव होत आहे. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण नजीकच्या भविष्यात जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. 'विकसित' आणि 'आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात, राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडणं, ही नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

यंदा नवरात्रीपासून आतापर्यंत खरेदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या पाहणीत समोर आलं आहे. या कालावधीत पाच लाख ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची विक्री झाल्याचं संघटनेच्या सर्वेक्षणात आढळून आलं. जीएसटी कपातीमुळे विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७२ टक्के व्यापाऱ्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पावसामुळेच वेळेत होऊ न शकल्यानं बिनचूक आकडेवारी शासनाला वेळेत मिळू शकली नाही, त्यामुळे दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्यायला उशीर होत आहे, अशी खंत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. त्याच वेळी, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांना मदत करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सुरुवातीचे पंचनामे दोन हेक्टरपर्यंत झाले होते, आता ते तीन हेक्टरचे होणार आहेत. त्यासाठी नुकसानभरपाईचं वाटप करायला थोडा उशीर होत आहे, अशी कबुली त्यांनी दिली. विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगाची अट न घालता शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अदा करावी, अशा सूचना दिल्याची माहितीही भरणे यांनी दिली.

****

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे आठ हजार १३९ कोटी रुपये इतक्या रकमेचं अर्थसहाय्य वितरित करण्याचे शासन निर्णय जारी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मिळून ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये देण्यात येतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ ऑक्टोबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी सांवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १२७ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी १८००-११- ७८०० या टोल-फ्री क्रमांकावर, तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा My Gov ॲपवर नागरीकांना येत्या २४ तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील.

****

पोलीस स्मृतिदिन काल पाळण्यात आला. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लडाखमधे हॉट स्प्रिंग्ज इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. आपलं कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या भारतातल्या विविध पोलीस दलांमधल्या अधिकारी आणि अंमलदारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी असलेल्या संदेशपत्राचं यावेळी वाचन करण्यात आलं. हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधीही विसरणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

**

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

परभणी इथं पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हुतात्मा पोलिसांना अभिवादन केलं. भारतीय वीरांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून स्फूर्ती मिळावी तसंच आपल्या कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी यासाठी आज पोलिस स्मृतिदिन पाळला जात असल्याचं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या.

छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलिस आयुक्तालयात यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं.

****

दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रधानमंत्री आवास योजना तसंच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक घरकुलं वेळेत पूर्ण करण्यात आली असून, या कामासाठी सरकारमार्फत ९९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. या कामगिरीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, तसंच जिल्हा प्रशासनाचं आणि लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांसोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना किराणा सामान, सतरंजी, चादर भेट म्हणून दिल्या. खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भगवान बाबा बालिकाश्रम इथं अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

****

धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातल्या पारधी पिढी आणि फकिरा नगर इथं दिवाळी साजरी केली. याठिकाणी राहणाऱ्या वंचित कुटुंबांना मिठाईसह फराळाचं किट वाटप करण्यात आलं, तर ओवाळणीच्या निमित्ताने महिलांना साडी देऊन त्यांच्या आनंदात भर घातली.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथं श्रीरामजी कुटे गुरुजी फाउंडेशन च्या वतीने जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगावसह विविध भागातल्या अनाथ विद्यार्थ्यांसोबत काल दीवाळी साजरी करण्यात आली. यावेळी या मुलांना नवीन कपडे, फराळ, विविध शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं.

****

धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीनं आयोजित कनिष्ठ जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. खेळ खेळाडूंचं आयुष्य घडवत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने जाहीर केलेलं अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं नाही, याचा निषेधही यावेळी करण्यात आला.

****

राज्यात अनेक भागात काल पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस झाला. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातल्या लासूरस्टेशन, वाळूज, चापानेर परिसरातही मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी तसंच छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही काल जोरदार पाऊस झाला. दिवाळीच्या दिवशी आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पूजेचं साहित्य विक्री करणाऱ्यांची, तसंच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी धावपळ झाली.

**

नाशिक शहर आणि जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. येवला आणि सटाणा या दोन्ही तालुक्यात झालेल्या पावसामुळे काढून ठेवलेल्या मक्याचं नुकसान झालं. निफाड आणि कळवण मध्येही तासभर मोठा पाऊस झाला. रायगड जिल्यात उभ्या असलेल्या आणि कापून खलाटीत पडलेल्या भात पिकाचं नुकसान झालं.

**

बीड जिल्ह्यात माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

**

देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली, तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून चार दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

****

No comments: