Thursday, 23 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारताच्या ध्येयासाठी सर्व नागरिकांना समान संधी मिळणं अत्यावश्यक -राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेंबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा

·      भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा

·      १७ व्या रोजगार मेळाव्यात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

आणि

·      पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ॲडलेड इथल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

****

विकसित भारताच्या ध्येयासाठी सर्व नागरिकांना, विशेषतः दुर्बल आणि उपेक्षित घटकांना समान संधी मिळणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांच्या पुतळ्याचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. के. आर. नारायणन् यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि उच्च लोकशाही मूल्यांचा वारसा ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. नारायणन् यांनी राष्ट्र निर्माण आणि सर्वसमावेशक देशाच्या निर्मितीसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, असंही त्या म्हणाल्या. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा आधार आहे, यावर नारायणन् यांचा दृढ विश्वास होता असा उल्लेख त्यांनी केला.

****

दिवाळी आणि आगामी छठ पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेंबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतल्या विशेष वॉर रुममधून आढावा घेतला. या विशेष रेल्वेंचं निरीक्षण आणि देखेरेखीसाठी तसंच सणांच्या कालावधीत रेल्वेस्थानकांवर गर्दी झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने हा विशेष कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले

बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

देशात नियमित रेल्वेगाड्यांसोबतच दीड हजार विशेष रेल्वेगाड्या दिवाळीच्या काळात सोडण्यात येत असून, दररोज ३०० विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या महिन्याच्या एक तारखेपासून पुढील महिन्याच्या ३० तारखेपर्यंत १२ हजारांहून अधिक विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

बिहारमध्ये विधासभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. महाआघाडी सत्तेत आली तर विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली.

****

देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात. तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावाबहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या.

****

प्रथेनुसार भाऊबीजेच्या दिवशी आज उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची दारं विधिवत बंद करण्यात आली. शीतकालात केदारनाथांची प्रतिमा उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात आणि देवी यमुनेची प्रतिमा खारसाली इथं ठेवण्यात येणार आहे. या मोसमात १७ लाख ६८ हजार ७९५ भाविकांनी केदारनाथांचं दर्शन घेतलं. उद्या शनिवारी केदारनाथांची पालखी उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात पोहचेल तिथे ६ महिने त्यांचा मुक्काम असेल.

****

संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी अत्याधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनात प्रकल्प उभारणार असून, या प्रकल्पासाठी मिहान तर्फे २३३ एकर भूखंडाचं वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ही कंपनी राज्यात १२ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून, या प्रकल्पामुळे सहा हजार ८०० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

****

१७ व्या रोजगार मेळाव्याचं उद्या देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ५१ हजारांहून अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे.

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रेला आज सुरवात झाली. कुकडेल इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही सरदार सन्मान यात्रा सुरु झाली. २८ ऑक्टोंबर पर्यत नंदुरबार जिल्ह्यातल्या १२० हुन अधिक गाव-खेड्यांमध्ये भ्रमंती करुन ही यात्रा एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणार आहे.

****

परभणीमध्ये पालम तालुक्यातल्या चाटोरीमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो. यावेळी सैनिक आणि कुटुंबीयांचा मानपत्र, शाल, श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

****

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लाडगाव इथं भेट देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसंच नागरिकांशी संवाद साधला. लाडगाव इथले सरपंच गजानन बागल आणि विजय बागल यांच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ या कार्यक्रमाला बागडे उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते नेकनूर इथल्या श्रीगुरू बंकटस्वामी देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत एकूण तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत प्रसादालय बांधकाम, भक्तनिवास, संरक्षण भिंत आणि स्वच्छता गृह या महत्त्वाच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

****

क्रिकेट

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला ॲडलेड इथं झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी राखून जिंकला असून, मालिकाही दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं ४७व्या षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं.

****

महिला क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना सुरु आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४५व्या षटकात दोन बाद २८७ धावा झाल्या होत्या. स्मृति मंधाना १०९ आणि प्रतिका रावल ८५ धावांवर खेळत आहे. उपान्त्य फेरीत दाखल होण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.

****

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून निवडण्यात आलं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी सहा ते २२ फेब्रुवारी या दरम्यान इटलीत मिलान आणि कोर्टिना डी अमपेत्झो इथं होणार आहे.

****

लातूर महानगरपालिकेच्या वतीने दीपावलीच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेत सुमारे ६० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. दिवसरात्र राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्‍य स्‍वच्‍छता निरीक्षक, स्‍वच्‍छता निरीक्षक, स्‍वच्‍छता विभागातले २५० कर्मचारी सहभागी झाले होते.

****

राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रं तात्काळ सुरू करावीत आणि भावांतर योजनालागू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर फरकाची रक्कम जमा करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिलं.

****

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं उद्या २४ तारखेला जनाअक्रोश मोर्चा आयोजित करण्याची केलेली विनंती क्रांती चौक पोलीस ठाण्याने फेटाळली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्तेवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मुख्य मागणीसाठी आपण हा जनाअक्रोश मोर्चा काढणार असून पोलिसांची परवानगी नसेल तरीही कोणत्याही परिस्थितीत मोर्चा हा निघेल असं वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनी म्हटलं आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या गणेशवाडी पोड इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदि कर्मयोगी अभियानाअंतर्गत आदि सेवा केंद्राचं उद्घाटन केलं. या सेवा केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि कौशल्य विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये यामुळे विकास घडवून येत असल्याचं उईके यांनी सांगितलं.

****

No comments: