Sunday, 21 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विधेयक लागू झाल्यानंतर महागाई दोन टक्क्यांनी कमी होईल, आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल, असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे. जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत सोनं, बिस्कीटं आणि विडी यासारख्या वस्तुंवरचे कराचे दर निश्चित करण्यात येणार असल्याचं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. राज्यांना कमी महसुलामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई, कार आणि तंबाखूसारख्या वस्तुंवर उपकर लावून केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक पारित करण्यासाठी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशना आज दुसऱ्या दिवशी मुख्य विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विविध मुद्दे मांडत, देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांनी या कायद्यात बऱ्याच उणीवा असल्याचं म्हटलं असल्याकडे पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.
विधान परिषदेत आज वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी मांडलं. या कायद्यामुळे रद्द होणाऱ्या करांच्या प्रलंबित रकमेची वसुली करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहेत, हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. कायदे करताना संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करावी अशी मागणी काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी केली.

****

राज्य मतदा दिन हा राष्ट्रीय मतदार दिनीच साजरा करावा, यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले आहेत.
निवडणूक आयोगानं एक जुलै हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून याच दिवशी साजरा होत असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर, निंबाळकर यांनी हे आदेश दिले.

****

राज्यात डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व शाळा डिजिटल होणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री बोलतोय, या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत ग्रामीण भागात ४४ हजार शाळा डिजिटल झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे ११ डबे आज दुपारी उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जवळ रुळावरुन घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही गाड्यांच्या वेळेवर परिणाम झाला.

****

स्वच्छता अभियान आणखी व्यापक करण्यासाठी भारतीय रेल्वेनं रुळांच्या स्वच्छतेसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वेक्षण स्वतंत्र संघटनेद्वारे करण्यात येणार आहे.

****

अमेरिकत नासा या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या एका नवीन जीवाणूला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं आहे. सॉलीबेसिलस कलामी असं या जीवाणूचं नामकरण करण्यात आलं आहे. 

****

जम्मु काश्मीरमध्ये नौगाम परिसरात लष्करी जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले, आज दुपारच्या सुमारास ही चकमक झाली. या चकमकीत तीन भारतीय जवानांना वीरमरण आलं.

****

भारतीय जनता पक्षानं अद्याप राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित केला नसल्याचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव पक्षानं यापूर्वीच नाकारला असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.

****

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनेनं दर्शवलेल्या विरोधाचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, तसंच शेतकरी संघर्ष समितीनं स्वागत केलं आहे. भाकप नेते राम बाहेती यांनी पक्षाची ही भूमिका मांडली.

****

अहमदनगर शहरातल्या एका कांदा व्यापाऱ्याकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नगर शहरातली ही पहिलीच मोठी कारवाई असून या प्रकरणी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.

****

लातूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन पदांसाठी चार तर काँग्रेसकडून दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लातूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

****

इंडियन प्रिमीयर लिग - आयपीएलच्या दहाव्या सत्राचा अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंटस् या संघादरम्यान हैदराबाद इथं होणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मुंबई संघानं यापूर्वी दोन वेळा हा चषक जिंकला आहे, तर पुणे संघ अंतिम सामन्यात प्रथमच पोहोचला आहे.

****

No comments: