Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २८
मे २०१७ दुपारी १ वा
****
सगळ्या प्रकारचे धर्म, उपासना
पध्दती, विचार प्रवाह, समुदाय आणि परंपरांचं अस्तित्व भारतात असून ही आपल्यासाठी अभिमानाची
गोष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या
मन की बात या कार्यक्रमाच्या ३२व्या भागात ते आज बोलत होते. देशवासियांशी संवाद साधताना
सर्वप्रथम त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्याला प्राप्त झालेल्या संदेशांमधून अनेक जण काहीतरी नवीन शिकत असल्याचं आढळल्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा गौरवपूर्ण उल्लेख
करत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सावरकरांच्या त्याग आणि बलिदानाची
आठवण ठेवण्याचं आवाहन केलं. काळ्या पाण्याच्या शिक्षेत सावकरांनी भोगलेल्या यातना आणि
प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक भाषा बोलणाऱ्या, प्रत्येक पिढीच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी
भोगलेल्या त्रासाचं स्मरण नव्या पिढीनं ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
येत्या पाच जून रोजी जागतिक
पर्यावरण दिन असून संयुक्त राष्ट्र संघटनेनं यंदा निसर्गाप्रती संलग्नता ही संकल्पना
ठेवली आहे. निसर्गात एक मोठी चेतनाशक्ती आणि ऊर्जा असून पर्यावरणाचं आपण रक्षण केलं
तरच पुढच्या पिढ्यांना आपण काही देऊ शकू असं पंतप्रधान म्हणाले. पावसाळ्यात राज्याराज्यात
राबवल्या जाणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाला आणखी प्रोत्साहन आणि चालना मिळावी अशी अपेक्षा
पंतप्रधानांनी व्यक्त केली.
येत्या २१ जून रोजी जागतिक
योग दिन असून योगाचा प्रचार जगाच्या कानाकोपऱ्यात झाला असल्याचं ते म्हणाले. शरीर,
मन, बुध्दी आणि आत्म्याबरोबरच योग आता संपूर्ण जगाला जोडत असल्याचं ते म्हणाले. आजकालच्या
धकाधकीच्या आणि तणावग्रस्त आयुष्यात योगाचा अंतर्भाव अतिशय महत्वाचा असल्याचं पंतप्रधान
मोदी म्हणाले. यंदा तिसरा जागतिक योग दिन आहे. यानिमित्त आजी-आजोबा, आई-वडील आणि मुलगा-मुलगी
अशा तीन पिढ्यांनी सोबत योगासनं करत तसं छायाचित्रं नरेंद्र मोदी ॲप आणि माय जीओव्हीवर
पाठवावं असं ते म्हणाले. ही संकल्पना सुचवणाऱ्याचं कौतुक करत त्यांनी अभिनंदन केलं.
येत्या एक जून पासून २१ जूनपर्यंत ट्विटरवर योगासंदर्भात नियमित माहिती देण्याचं आश्वासनही
पंतप्रधानांनी यावेळी दिलं.
****
झिका विषाणूचा भारतात शिरकाव
झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं खात्रीपूर्वक सांगितलं आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरातल्या
बापूनगर भागात एका गरोदर महिलेसह तीन जणांना या विषाणुची बाधा झाल्याचं वृत्त आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं या वृत्ताचं समर्थन केलं आहे.
****
पर्यावरण अनुकूल इंधन वापर
आणि चांगल्या आरोग्यासह महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट असणाऱ्या प्रधानमंत्री उज्वला
योजनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ७५ टक्के पात्र लाभार्थ्यांना
स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरवण्यात आली आहे. यात ग्रामीण भागातील कुटुंबांचा अधिक
प्रमाणात समावेश आहे. यामुळे चुलीवर स्वयंपाक करणं कमी झाल्यानं वृक्षतोड कमी होणं
आणि चुलीच्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या कमी होणं असे लाभ मिळत आहेत.
****
राष्ट्रीय पत्रकार संघाच्या
महाराष्ट्र शाखेच्या वतीनं आयोजित महिला पत्रकारांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन येत्या
२४ आणि २५ जूनला पनवेल इथं होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून, समारोप सत्रात केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि गृह राज्यमंत्री रणजीत पाटील उपस्थित राहणार
आहेत. या संमेलनात देशभरातून पाचशेहून अधिक महिला पत्रकार सहभागी होणार आहेत. शाखेचे
अध्यक्ष उदय जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्यातल्या १० महिला पत्रकारांना त्यांच्या
योगदानासाठी गौरवण्यात येणार आहे.
****
बदलत्या काळात शेतकऱ्यांना
आधार देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे, असं कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
आयोजित शेती समृद्ध शेतकरी मोहीमेअंतर्गत शास्त्रज्ञ संपर्क प्रशिक्षण कार्यक्रमात
ते बोलत होते. कुलगुरु डॉ. बी व्यंकटेश्वरलू यावेळी उपस्थित होते. उत्पादनात वाढ करणारं,
बदलत्या वातावरणात टिकणारं रोगमुक्त वाण आवश्यक आहे. कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या
बांधावर जाऊन त्यांना नवीन संशोधनाची, पिकांची, वाणांची माहिती द्यावी, असं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment