Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनी,
स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते जर्मनी इथं पोहोचले.
व्यापर - उद्योग, आर्थिक सहकार्य आणि दहशतवादाचा सामना या मुद्यांवर ते या दौऱ्यात
भर देतील. पंतप्रधान चौथ्या इंडो जर्मन चर्चासत्रामध्येही सहभागी होणार असून, जर्मन
चॅन्सेलरची भेट घेणार आहेत.
****
पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवायांना
पाठबळ देणं थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर भारताचा क्रिकेट सामना होऊ शकत नाही,
असं क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र राहू शकत
नाही, असं ते म्हणाले. मात्र याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी
आयनं सरकारशी बोलणी केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरू
असलेल्या दहशतवादी कारवाया या युद्धाप्रमाणे असून, त्या थांबवण्यासाठी नवीन पद्धत अवलंबण्याची
गरज आहे, या लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्याला केंद्र सरकारनं पाठिंबा
दिला आहे. काश्मीरमध्ये सध्या उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य उपाययोजना
करणं गरजेचं असून, रावत यांचा विचार बरोबर असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू
यांनी म्हटलं आहे. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेता मोहम्मद सलीम यांनी रावत यांचं
हे वक्तव्य चूकीचं असल्याचं म्हटलं होतं.
****
दरम्यान, काश्मीरमध्ये सुरु असलेल्या
तणावाच्या परिस्थितीतही श्रीनगर आणि पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद दरम्यान
कारवा ए अमन नावाची बससेवा सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी श्रीनगरहून ही बस रवाना
झाली.
****
१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा
अंतिम निकाल मुंबईचं विशेष टाडा न्यायालय येत्या १६ जूनला सुनावणार आहे. आज या प्रकरणाचा
निकाल सुनावण्याची शक्यता होती, मात्र ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं न्यायालयानं
सांगितलं. आरोपी अबू सालेम याच्यासह सात जणांविरोधात निकाल सुनावण्यात येणार आहे.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा
निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता एस एम एस द्वारे किंवा मंडळाच्या संकेतस्थळावर
निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एच रिझल्ट
डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
****
भाषणाने नव्हे तर आचरणाने माणूस
मोठा होतो, हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या कृतीतून दाखवून
दिलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा
इथं अरुणभाई गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुणभाईंनी पथदर्शीचं कार्य केलं, असं ते म्हणाले.
एकही आरोप नसलेले नेते म्हणून अरुणभाईंचा नावलौकीक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्षत्र खासदार शरद पवार यावेळी म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातले
मंत्री उपस्थित होते.
****
पंढरीच्या वारीत पर्यावरण रक्षणासंदर्भात
प्रबोधन करण्याचं आवाहन अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारकऱ्यांना केलं
आहे. ते आज लातूर इथं सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना
बोलत होते. संत साहित्य संमेलनं निरंतर सुरु राहावीत यासाठी राज्यसरकार मदत करेल असं
आश्वासन त्यांनी यावेळी दिल. उद्घाटनापूर्वी वारकरी दिंडी काढण्यात आली. समाजात वाढत
जाणारा द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका असल्याचं गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी,
साहित्य संमेलनाला राज्य सरकारानं कायमस्वरुपी पन्नास लाख रुपये दर वर्षी मदत करण्याची
मागणी केली.
****
येत्या एक जूनपासून प्रस्तावित असलेल्या
शेतकऱ्यांच्या संपाचं नियोजन करण्यासाठी अहमदनगर इथं उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं
आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना संपूर्ण
कर्जमाफी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी एक जून पासून संपावर जाणार
आहेत. दरम्यान, या संपाला गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांकडून पाठिंबा मिळतांना
दिसत आहे. नगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं संपाच्या पूर्वीच शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन
सुरू केलं आहे.
****
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदीरातली
मूर्ती झिजू लागल्याचं तसंच पांढरी पडू लागल्याचं वृत्त गेल्या दोन दिवसांपासून प्रसार
माध्यमांमध्ये येत आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार
यांनी आज मुर्तीची पाहणी केली. यासंबंधी औरंगाबादच्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या
अधिकाऱ्यांना बोलवून वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment