Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं
आज सकाळी झालेल्या शक्तीशाली आत्मघातकी बाँबस्फोटातल्या मृतांची संख्या ऐंशीवर तर जखमींची
संख्या साडेतीनशेवर पोचली आहे. भारतीय दुतावासातले कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती,
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाचा
निषेध केला असून, दहशतवादाशी लढण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या बरोबर आहे, असं याबाबतच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रासह
इतर अनेक क्षेत्रात भारत आणि स्पेन एकमेकांना सहकार्य करू शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. स्पेनची राजधानी माद्रिद इथं स्पेनचे राष्ट्रपती मरियानो रॉखॉइ
यांच्यासह प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते आज बोलत होते. स्मार्ट सिटी अभियानात
आणि रेल्वेक्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी स्पेनला निमंत्रित केलं. सायबर
सुरक्षा, तांत्रिक सहाय्य, नूतनशील ऊर्जा यासह इतर क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचे सात
करार यावेळी करण्यात आले.
****
एस एम एस सुविधेचा वापर करून नागरिकांनी
त्यांचा आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडावा, असं आवाहन आयकर विभागानं केलं आहे. ५६७६७८
किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून या दोन्ही क्रमांकांना एकमेकांशी जोडता येईल,
असं या विभागानं कळवलं आहे. याशिवाय आयकर विभागाच्या अधिकृत ई फायलिंग संकेतस्थळावरूनही
हे दोन क्रमांक जोडता येतील.
****
काँग्रेसचे नेता आणि माजी आमदार
बाबा सिद्दिकी यांच्या पाच ठिकाणांवर आज सक्तवसुली संचालनालयानं छापे घातले. सिद्दिकी
यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुंबईतल्या बांद्रा इथल्या
झोपडपट्टीच्या विकासकामाच्या नावाखाली सिद्दिकी यांनी हा घोटाळा केल्याची तक्रार मिळाल्यानंतर,
संचालनालयानं ही कारवाई केली आहे.
****
जलयुक्त शिवारातून झालेलं काम हे
शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी असून ही योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिजच्या
वतीनं औरंगाबाद इथं आयोजित ‘दुष्काळ प्रवण ते दुष्काळमुक्त’ या विषयावरच्या एक दिवसीय
राज्यस्तरीय परिसंवादात ते आज बोलत होते. शासनाला राज्यात पाण्याची स्थिती जाणून घेता
यावी आणि आवश्यक ती उपाययोजना करता यावी, यासाठी वॉटस्कन हे तंत्रज्ञान सीआयआय नं बनवलं
असून ते उपग्रहाद्वारे मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर सह
राज्यातल्या तेरा जिल्ह्यांचा अभ्यास करणार असल्याचं त्रिवेणी पाणी संस्थेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉक्टर कपील नरूला यांनी यावेळी सांगितलं. या परिसंवादाला जिल्हाधिकारी
नवलकिशोर राम, बजाज कंपनीचे उपाध्यक्ष मधूर बजाज, सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला यांच्यासह
देशभरातल्या अनेक कंपन्यांच्या तज्ज्ञांचा सहभाग होता.
****
महाराष्ट्र राज्य शिक्षण तंत्रज्ञान
संस्था अर्थात बालचित्रवाणी ही संस्था आजपासून बंद करण्यात आली आहे. शैक्षणिक कार्यक्रम
निर्माण करणाऱ्या या संस्थेची जागा आता ई-बालचित्रवाणी ही संस्था घेईल आणि एका विशेष
वेबपोर्टलवर वर्चुअल अर्थात आभासी वर्ग आणि दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम निर्माण
करेल. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी ही नवी संस्था काम करणार
आहे.
****
महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या
वारकऱ्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करुन तो पैसा पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी
वापरण्याचा ठराव लातूरमध्ये झालेल्या सहाव्या संत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशात
मंजूर करण्यात आला. तीन दिवस सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा
समारोप आज झाला. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधे वृक्षलागवड करुन लातूर जिल्हा
वृक्षमय करण्याचा ठरावही या संमेलनात मंजूर करण्यात आला.
****
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या
दोनशे ब्याण्णवाव्या जयंतीच्या निमित्तानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री
अतिथीगृहात अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या
जामखेड तालुक्यातल्या चोंडी या अहिल्याबाईंच्या जन्मगावी आमदार गणपतराव देशमुख यांच्या
अध्यक्षतेखाली आज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. औरंगाबादच्या विभागीय
आयुक्त कार्यालयात तसंच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाईंच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
No comments:
Post a Comment