Sunday, 28 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.05.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·      जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद बटसह आठ दहशतवादी ठार

·      निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना स्वत:बरोबर जोडीदाराच्या उत्पन्नाचा स्त्रोतही, जाहीर करावा लागणार

·      केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

आणि

·      पवित्र रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल इथं काल सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद बट सह दोन दहशतवादी ठार झाले. गेल्या वर्षी बुरहान वाणी ठार झाल्यानंतर सबजार कमांडर झाला होता. सुरक्षा दलाच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यावर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती. या गोळीबारात जखमी झालेल्या एका स्थानिक तरूणाचं रूग्णालयात निधन झालं. सबजार ठार झाल्यानंतर दक्षिण काश्मीरमधे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सरकारनं मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे.

एका अन्य घटनेत, बारामुल्ला आणि उरी क्षेत्राजवळच्या रामपूर सेक्टरमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. ते भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते.

****

ग्रामीण विकास हे मोदी सरकारचं ध्येय असून सरकारनं ग्रामीण विकासासाठीची आर्थिक तरतूद ६२ टक्क्यांनी वाढवली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते बोलत होते. २०१३ -१४ या वर्षात अठ्ठावन्न हजार ६३० कोटी रुपये असलेली ही तरतूद २०१६-१७ या वर्षात ९५ हजार ९९ कोटी रुपये एवढी झाल्याचं तोमर म्हणाले. ग्राम पंचायती अधिक सक्षम करण्यासाठी ग्राम विकासासाठीची तरतूद २०१७-१८ या वर्षात एक लाख पाच हजार ४४८ कोटी रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचंही तोमर यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं एकीकृत विकास, सर्वसमावेशक विकास आणि सुशासनाला प्राधान्य दिल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या विविध योजनांवर आधारीत १४ लघुपटांच्या प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

****

२०१९ पर्यंत देशातल्या ग्रामीण भागात एक कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी सांगितलं . नवी दिल्ली इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दररोज १३० किलोमीटर रस्ते बांधून पूर्ण होत असल्याचंही ते म्हणाले. मेरी सडक या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यांसंबधी तक्रारी दाखल करता येतील, असं त्यांनी सांगितलं. तसंच सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन लाख गावं निर्मल झाली असल्याचं यादव यावेळी म्हणाले.  

****

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना आता स्वत:च्या उत्पन्नाच्या स्त्रोताबरोबर जोडीदाराच्या उत्पन्नाचा स्त्रोतही, जाहीर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगानं केलेल्या सूचनांनुसार सरकारनं यासंदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. पूर्वी उमेदवाराला अर्ज भरताना आपल्या तसंच जोडीदाराच्या आणि अवलंबून असलेल्या तीन व्यक्तींच्या संपत्तीची माहिती जाहीर करावी लागत असे. याशिवाय आता उमेदवार कुठल्या लाभाच्या पदावर किंवा सरकारी कंपनीत व्यवस्थापक पदावर आहे का, हे जाहीर करावं लागणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ-सीबीएसई च्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हे निकाल “सीबीएसई रिझल्टस डॉट एनआयसी डॉट इन” आणि “सीबीएसई डॉट एनआयसी डॉट इन” या संकेतस्थळावर पाहता येतील.

दरम्यान, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख उद्या जाहीर होणार आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एस.टी.च्या सर्व बसगाड्यांवर येत्या काळात जय महाराष्ट्र लिहिलं जाणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. काल एस.टी.च्या पुणे विभागीय कार्यालयातल्या सौर ऊर्जा संयंत्रणेचं उद्घाटन रावते यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा बत्तीसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन आज सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजानच्या महिन्याला आजपासून प्रारंभ झाला. काल संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानं आजचा पहिला रोजा असणार आहे. यानिमित्त काल रात्री महिनाभर महत्वाची असलेल्या तरावीह या विशेष नमाजलाही सुरुवात झाली.  

****

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं अपघातग्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरची दिल्लीच्या पथकानं काल पुन्हा तांत्रिक तपासणी केली, या तपासणीत, अपघात झाला त्यावेळचे नोंदवलेलं तापमान, इंधनाचा साठा याचं मोजमाप करण्यात आलं आहे. काल दुपारी बाराच्या सुमारास ही तांत्रिक तपासणी पूर्ण केली.

आता अपघातासंदर्भातली पुढील तपासणी तसंच अपघातग्रस्त हेलीकॉप्टर हलवण्यासंदर्भातली सर्व कारवाई, नागरी उड्डाण संचालनालयाचा देखभाल दुरुस्ती विभाग करणार आहे.

****

केंद्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त काल नागपूर इथं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडेंसह विविध केंद्रीय तसंच राज्य मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. अन्य एका कार्यक्रमात गडकरी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पसायदान या गौरव अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

नांदेड इथं काल रात्री वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणातला उष्मा कमी झाल्यानं  शहरवासीयांना दिलासा मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या विदर्भातल्या जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

हिंगोली इथले ज्येष्ठ नेते विधीज्ञ माधवराव नाईक यांचं काल दिर्घ आजारानं निधन झाल. ते ७२ वर्षांचे होते. आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर हिंगोली इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही काळ भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघात असलेले नाईक यांनी त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही कार्य केलं. अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे.

****

महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं लातूर इथं उद्यापासून तीन दिवसीय सहाव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा संमेलनाचे मुख्य संयोजक विठ्ठल पाटील यांनी काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलताना दिली.

 साहित्य संमेलनाचा प्रारंभ उद्या सकाळी ७ वाजता दिंडी सोहळ्यानं होईल. एकूण सात सत्रात पार पडणाऱ्या या संमेलनात शेतकरी आत्महत्या रोखणं, स्त्रीभृण हत्या रोखणं, पाणी नियोजन,  आदी महत्वपूर्ण विषयावरील परिसंवाद पार पडणार आहेत.

****

औरंगाबाद नजीक असलेलं दाभरुळ हे गाव विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दत्तक घेऊन, काल त्याठिकाणी श्रमदान केलं तसंच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात वृक्ष लागवडीसाठी दहा हजार खड्डे खोदण्यात आले असून, जलयुक्त शिवारची कामंही पूर्ण झाली आहेत.

****

सोलापूर रेल्वे विभागातलं अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी रेल्वे स्थानक संपूर्णपणे रोखरहित व्यवहार करणारं तसंच डिजिटल असणारं राज्यातलं पहिलं रेल्वेस्थानक ठरल्याचं सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे.

****

No comments: