Saturday, 27 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत आणि मॉरिशस या दोन देशांदरम्यान आज परस्पर सामंजयस्यांचे चार करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर, सागरी सुरक्षा, शिक्षण आणि संशोधन, सौर भागीदारी आदी क्षेत्रात या दोन देशा दरम्यान सामजंस्याच्या करारावर सह्या करण्यात आल्या. मॉरिशसला ५०० मिलियन डॉलर्सचं कर्ज देण्याच्या कराराचाही यात समावेश आहे.
तत्वपूर्वी भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. त्यानंतर जगन्नाथ यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.     

****

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागात बंद पाळण्यात येत आहे. अनंतनाग इथं हिंसक आंदोलना दरम्यान एकजण जखमी झाला आहे. सबजार अहमद हा बुरहान वानीचा सहकारी होता. तो ठार झाल्याचं कळताच त्राल आणि अनंतनागमधल्या खानाबालसह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

आज सकाळच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी अहमद आणि त्याच्या एका साथीदारास ठार केलं.

****

श्रीलंकेत पूर आणि भुस्खलनात शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १४ जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत झालं असून, बचावकार्य सुरु आहे. भारतानंही पूरग्रस्तांना नौदलाच्या एका जहाजातून मदत पाठवली आहे. दरम्यान, हवामान खात्यानं आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

****

२०१९ पर्यंत देशातल्या ग्रामीण भागात एक कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी सांगितलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दररोज १३० किलोमीटर रस्ते बांधून पूर्ण होत असल्याचं ते म्हणाले. मेरी सडक या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यांसंबधी तक्रारी दाखल करता येतील, असं त्यांनी सांगितलं. तसंच सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन लाख गावं निर्मल झाली असल्याचं यादव म्हणाले.  

****

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता स्वत:च्या उत्पन्नाच्या स्त्रोताबरोबर जोडीदाराच्या उत्पन्नाचा स्त्रोतही उमेदवारी अर्ज भरताना जाहीर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगानं केलेल्या सूचनांनुसार सरकारनं यासंदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. पूर्वी उमेदवाराला अर्ज भरताना आपल्या तसंच जोडीदाराच्या आणि अवलंबून असलेल्या तीन व्यक्तींच्या संपत्तीची माहिती जाहीर करावी लागत असे. याशिवाय आता उमेदवार कुठल्या लाभाच्या पदावर आहे का, किंवा सरकारी कंपनीत व्यवस्थापक पदावर आहे का, हे जाहीर करावं लागणार आहे.

****

मतदान यंत्र – ईव्हीएम मध्ये फेरफार करून दाखवण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं स्वीकारलं असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. येत्या तीन जून ला हे पक्ष ईव्हीएम मध्ये फेरफार होऊ शकतो, याचं प्रात्यक्षिक दाखवतील. आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आदी पक्षांनी या आव्हानाचा स्वीकार केला नाही. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ-सीबीएसई च्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हे निकाल “सीबीएसई रिझल्टस डॉट एनआयसी डॉट इन” आणि “सीबीएसई डॉट एनआयसी डॉट इन” या संकेतस्थळावर पाहता येतील.
दरम्यान, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे.

****

औरंगाबाद नजीक असलेलं दाभरुळ हे गाव विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दत्तक घेऊन, आज त्याठिकाणी श्रमदान केलं. आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात वृक्ष लागवडीसाठी दहा हजार खड्डे खोदण्यात आले असून, जलयुक्त शिवारची कामंही पूर्ण झाली आहेत.

****

No comments: