आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००
****
विविध अल्पबचत
योजनांमध्ये सुसूत्रता आणि लवचिकता आणण्याच्या दृष्टीनं वित्त विधेयक २०१८ मध्ये काही
सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा विचार आहे. यानुसार,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
खातं मुदतीआधी बंद करायला, तसंच अठरा वर्षांखालच्या बालकांच्या नावांनी अल्पबचत खाती
उघडण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात
ही माहिती दिली असून, गुंतवणूकदारांच्या सगळ्या हक्कांचं रक्षण केलं जाईल, असं यात
म्हटलं आहे.
****
देशातल्या
पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पायाभरणी समारंभ येत्या रविवारी,
अठरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वर्ष २०२० पासून या
विमानतळावरून उड्डाणं सुरू करण्याचं नियोजन
आहे. सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर, पनवेल तालुक्यातल्या
दहा गावांच्या शिवारात उभारल्या जाणाऱ्या, या विमानतळात साडेचार किलोमीटर लांबीच्या
दोन धावपट्ट्या असतील. या विमानतळावरून वर्षभरात सहा कोटी प्रवाशांची वाहतूक शक्य होईल.
****
परदेशी विद्यापीठांमध्ये
वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता राष्ट्रीय पात्रता
प्रवेश परीक्षा-नीट- उत्तीर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
भारतीय वैद्यकीय परिषदेच्या यासंदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावर्षीच्या
मे महिन्यापासून हा नियम अंमलात येईल. परदेशातली विद्यापीठं शैक्षणिक क्षमता लक्षात
न घेताच भारतीय विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमांना प्रवेश देतात, आणि त्यानंतर असे
विद्यार्थी भारतातल्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या परीक्षेत अयशस्वी होत असल्याचं आढळून
आल्यामुळे सरकारनं हा नियम लागू केला आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या सलीम अली सरोवराजवळ काल पहाटे झालेल्या अपघातात अनिकेत शिवाजी घोडके हा विद्यार्थी
मृत्युमुखी पडला तर अन्य एक जण जखमी झाला. या दोघांची दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्यानं
हा अपघात झाला.
*****
***
No comments:
Post a Comment