Friday, 16 March 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.03.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६ मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधे इंफाळ इथं मणीपूर विद्यापिठात आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून वंचितांपर्यंत पोचायचंय, ही यावेळच्या अधिवेशनाची संकल्पना आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातले जगभरातले मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत. या अधिवेशनाबरोबरच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, एक हजार अंगणवाडी केंद्र, शिक्षक-डॉक्टर्स-परिचारकांसाठी १९ निवासी संकुल, आणि इतर विकास प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

****

जम्मू कश्मीरमध्ये श्रीनगर शहराबाहेर काल रात्रभर चाललेल्या कारवाईत दोन अज्ञात दहशतवादी मारले गेले. एका स्थानिक भाजपा नेत्याच्या सुरक्षारक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर या भागात शोधमोहिम राबवण्यात आली. मोहिमेच्या सुरूवातीला केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला. या कारवाईदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी शस्त्र आणि दारूगोळ्यासह इतर काही वस्तूही जप्त केल्या.

****

नंदुरबार वनविभागाच्या पथकानं गुप्त माहीतीच्या आधारे सापळा रचून वन्य प्राणी आणि त्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. कोरीट गावानजीक जेरबंद करण्यात आलेल्या या तिघांकडून एक जिवंत मांडुळासह बिबट्याची कातडी आणि अन्य एका प्राण्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी वनविभाग अधिक तपास करत आहे.  

****



राज्यात काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी पाऊस पडला. जुन्नर भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू आणि हरभऱ्याचं नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

औरंगाबाद इथं आज मराठा आरक्षणावर जनसुनावणी होणार आहे. शहरातल्या सुभेदारी विश्रामगृह इथं संध्याकाळी चार वाजेपर्यंत नागरिक, संस्था, संघटनांकडून यासंदर्भातली निवेदनं स्वीकारण्यात येणार आहेत.



//********//


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...