Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०१८ दुपारी १.०० वा.
****
वैज्ञानिकांनी नागरिकांच्या
फायद्यासाठी तसंच देशाच्या विकासासाठी संशोधन वाढवावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. मणिपूरमधे इंफाळ इथं आज मणिपूर
विद्यापीठात आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. संशोधन तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची भारताकडे
खूप मोठी परंपरा आणि इतिहास असल्याचं ते म्हणाले. देशाच्या वाढीसाठी आणि
समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचं
आवाहनही त्यांनी यावेळी केलं. शालेय मुलांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा विकसित
करण्याची विनंती त्यांनी वैज्ञानिकांना केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून
वंचितांपर्यंत पोहोचणं, ही यावेळच्या अधिवेशनाची संकल्पना आहे.
****
दिवंगत शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांच्यासह इतर दिवंगत
सदस्यांना आज लोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १३ मार्चला छत्तीसगढमधल्या सुकमा
जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या नऊ
जवानांनाही सदनात आदरांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी, परवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होत असलेल्या नववर्षाच्या सर्व सदस्यांना तसंच सदनाच्या
वतीनं देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर अध्यक्षांनी प्रश्नकाळाचं कामकाज पुकारताच,
गेल्या सुमारे दोन आठवड्यापासून, विविध मुद्यांवर घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांनी हौद्यात
उतरुन फलक झळकावून घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी
बारा वाजेपर्यंत स्थगित केलं होतं.
राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना कामकाज
शांतपणे चालू देण्याचं आवाहन केलं. मात्र गदारोळ सुरु झाल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
तेलगु देसम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला
आहे. पक्षानं सरकारसोबत राहण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र सरकारनं आंध्र प्रदेशच्या
नागरिकांचा विचार केला नाही, असं पक्षाचे नेते वाय एस चौधरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. पक्षाचे खासदार थोटा नरसिंहम यांनी लोकसभा सचिवालयाला सरकारविरोधात
अविश्वास ठराव आणण्याची नोटीस दिली आहे. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं टीडीपीच्या
या ठरावाला पाठिंबा दिला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंम्हा
राव यांनी, या निर्णयामुळे भाजपला कोणताही धोका नसून, उलट सहजरित्या पक्षावर कारवाई
करता येईल, असं सांगितलं.
****
कमी खर्चातल्या घर योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी
खाजगी क्षेत्र आणि बांधकाम व्यावसायिकांनी महत्वाची भूमिका निभावली पाहिजे, अशी
अपेक्षा, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्लीमध्ये आयोजित दोन दिवसांच्या क्रेडाई परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते
बोलत होते. परवडण्याजोगी घरं बांधता यावीत, यासाठी
शहरांमध्ये कमी दरात जागेची उपलब्धता आणि वेगवेगळ्या परवानग्यांसाठी लागणारा वेळ, या
समस्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे, असं ते
म्हणाले.
****
व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी सर्व देशांनी
एकत्रितपणे काम करणं, तसंच अपवादात्मक उपाययोजना टाळून मतभेद मिटवणं आवश्यक
आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक
क्रिस्टीन लिगार्ड यांनी म्हटलं आहे. जी-ट्वेंटी
देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक पुढच्या आठवड्यात अर्जेंटिनामधे होत आहे, त्या
पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. व्यापार युद्धामुळे जागतिक वाढीला
खीळ बसेल असा इशाराही त्यांनी दिला.
****
आदीवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या १८ तारखेला
ठाण्याहून मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रमजिवी संघटना या मोर्चाचं
नेतृत्व करणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यातले आदीवासी या मोर्चात सहभागी होणार आहेत. आदीवासी
विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण आणि त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी सरकारकडे
करणार असल्याचं पंडित यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जालना
जिल्ह्यात अधूनमधून हलका पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबादसह
सर्व जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता
वर्तवण्यात येत आहे.
****
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या
उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताच्या पी व्ही सिंधुचा सामना जापानच्या नोजोमी
ओकुहोराशी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात तिनं थायलंडच्या निचाओ जिंदपोलला
२१ - १३, १३ - २१, १३ - २१, २१ - १८ असा पराभव केला. पुरूष एकेरीत भारताच्या एच एस
प्रणयनं इंडोनेशीयाच्या टॉमी सुगीराटोला २१ - १०, २१ - १९ असं पराभूत करत,
उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढचा सामना चीनच्या यूजियांग हुआँग
बरोबर होणार आहे.
//*********//
No comments:
Post a Comment