Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 07 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०७ मे २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मुंबई - औरंगाबाद
- नागपूर हे विशेष पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार
Ø आंतरजातीय
तसंच आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा
तयार करणार
Ø ज्येष्ठ भावगीत
गायक अरुण दाते यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार
आणि
Ø रोजगार निर्मितीची क्षमता
असलेला विद्यार्थी घडवण्यावर विद्यापीठाचा
भर - स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ जी एन शिंदे यांचं प्रतिपादन
****
मुंबई - औरंगाबाद - नागपूर या शहरांना
विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पर्यटन विभागाचे
मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती
दिली. यासंदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल तीन महिन्यात पूर्ण होईल, आणि त्यानंतर जगभरातून
निविदा मागवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना कोकण किनारपट्टीनंतर
औरंगाबाद इथं वेरुळ अजिंठा लेण्या, अहमदनगरचा भुईकोट किल्ला, शिर्डी, शनिशिंगणापूर
या स्थळांना भेटी देऊन, नागपूरला जंगल सफारी करता यावी, असा पर्यटन दौरा यात प्रस्तावित
असल्याचं, गौतम यांनी सांगितलं.
****
आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी
राज्य सरकार लवकरच एक कायदा करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतानाही माहिती दिली. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह
केल्यानंतर अशा जोडप्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी, त्यांना कशाप्रकारे
संरक्षण देता येऊ शकतं, यावर या कायद्यात जास्त भर देणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या
पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत शीव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, दाते
यांचं काल पहाटेच्या सुमारास मुंबईत राहत्या घरी निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
चार मे
१९३४ रोजी मध्यप्रदेशात इंदूर इथं जन्मलेले अरविंद दाते यांनी, प्रसिद्ध गायक कुमार
गंधर्व यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. १९५५ मध्ये आकाशवाणीवरून शुक्रतारा
मंद वारा या गाण्यानं त्यांच्या सांगितिक प्रवासाला प्रारंभ झाला, आणि अरुण दाते या
नावानं ते प्रसिद्ध झाले. ६० च्या दशकात त्यांनी गायलेल्या या शुक्रतारा आणि इतर गाण्यांना
गानरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले दाते यांनी, नोकरी
सांभाळत, भावगीत गायनाचे देश विदेशात सुमारे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम सादर केले.
स्वरगंगेच्या काठावरती, भातुकलीच्या खेळामधली, शतदा प्रेम करावे, अखेरचे येतील माझ्या,
येशील येशील येशील राणी, ही त्यांनी गायलेली गाणीही प्रचंड गाजली. त्यांचे मराठी तसंच
उर्दू भाषेतल्या गाण्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध आहेत. भावगीत गायनात मानाचा
समजल्या जाणाऱ्या पहिल्या गजानन वाटवे पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी दाते यांना
गौरवण्यात आलं होतं.
दाते यांच्या निधनाबद्दल समाजाच्या
विविध क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या
शोकसंदेशात, मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारे एक श्रेष्ठ गायक आपल्यातून निघून गेले,
या शब्दात दाते यांना श्रद्वांजली अर्पण केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जामीनावर सुटकेची प्रक्रिया काल पूर्ण झाली. पोलिसांनी
रुग्णालयात जाऊन, सुटकेच्या कागदपत्रांवर भुजबळ यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. आता डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाईल.
****
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या मुद्यावर
शिवसेना ठाम असल्याचा पुनरूच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल नाशिक
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषद आणि अन्य निवडणुका यामध्ये फरक असतो. विधान
परिषद निवडणुकीत संख्याबळ कागदावर स्पष्ट दिसतं. त्याआधारे आपण आपले उमेदवार जाहीर
केले, मात्र, ही पध्दत आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अवलंबली जाणार नाही, असं ठाकरे
यांनी स्पष्ट केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
रोजगार
निर्मितीची क्षमता असलेला विद्यार्थी घडवण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचं प्रतिपादन, नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ जी एन शिंदे यांनी केलं आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या
अभ्यासक्रमासाठीचा पंचवार्षिक बृहत्आराखडा तयार करण्यासाठी, काल लातूर इथं झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. अभ्यासक्रमाची
पुनर्रचना करण्यासाठी मान्यवरांचं योगदान
घेणार असल्याचं, शिंदे यांनी यावेळी
संगितलं. विद्यापीठाच्या
बृहत आराखड्याविषयी सूचना घेण्यासाठी विद्यापीठ क्षेत्रातल्या तिन्ही
जिल्ह्यांत बैठका घेणार असल्याचं,
बृहतआराखडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सांगितलं. यासाठी पालक
आणि प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनीही
सूचना कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं.
****
बीड जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा
पाण्यात बुडून मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यात सहा वर्षांची बालिका तलावात बुडून मरण
पावली, काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली, तर काल सायंकाळच्या सुमारास बीड शहराजवळ,
बिंदुसरा धरणात पोहोण्यासाठी उतरलेल्या मावस बहीण भावांचा बुडून मृत्यू झाला.
****
उस्मानाबाद इथल्या तेरणा
वरिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक जर्रा काझी यांच्या पार्थिव देहावर काल उस्मानाबाद इथं दफन संस्कार करण्यात आले. काझी
यांचं परवा रात्री औरंगाबादहून
उस्मानाबादला जाताना हृदयविकाराच्या
धक्क्यानं निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. सामाजिक तसंच शैक्षणिक कार्यात सक्रीय असलेले काझी यांची, हास्यव्यंग कवी, तसंच उत्तम व्याख्याते म्हणून ओळख होती.
****
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काल औरंगाबाद
इथं महसूल, भूमी अभिलेख विभागाचा सविस्तर आढावा घेतला. डिजिटल स्वाक्षरीचे सात बारा,
पाणी टंचाई निवारणासाठीच्या उपाययोजना, पात्र शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसान भरपाई,
समृद्धी महामार्ग भूसंपादन आदीं प्रकरणात वेळेत योग्य कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही
राठोड यांनी दिले.
****
जालना जिल्ह्यात जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या
एकशे शहात्तर गावांसाठी जलवाहिनी जाळे - ग्रीड पद्धतीची पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात
येणार असून, या योजनेचं कामं ५५ टक्के पूर्ण झालं आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या योजनेची तांत्रिक तपासणी आजपासून सुरु होणार
आहे. त्यापूर्वी या पथकासोबत लोणीकर यांनी काल या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत
होते.
****
परभणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निम्न दुधना
प्रकल्पातून उद्या मंगळवारी आठ मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या
गावांनी सतर्क रहावं, तसंच शेतकऱ्यांनी आपली जनावरे, पशु नदीपात्रात जाणार नाहीत याची
दक्षता घ्यावी, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या
गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी विद्युत मोटारीद्वारे उपसा करु
नये, असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष लातूरमध्ये जास्तीत
जास्त जागा जिंकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज
देशमुख यांनी व्यक्त केला आहे. काल वृत्तसंस्थेशी बोलताना देशमुख यांनी, लातूर महानगरपालिकेतल्या
भारतीय जनता पक्षाच्या ३४ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक काँग्रेसमधूनच भाजपत गेले आहेत,
याकडे लक्ष वेधलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या लोहारा इथं, नव्यानं बांधण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन,
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले न्यायमूर्ती
आणि उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती व्ही.के.जाधव यांच्या हस्ते काल झालं, यावेळी केलेल्या भाषणात न्यायमूर्ती जाधव यांनी, विधीज्ञांनी
परिपूर्ण अभ्यास करुन पक्षकारांना न्याय मिळवून द्यावा असं आवाहन, केलं आहे.
****
ट्रक आणि इतर मोठी वाहनं चोरुन त्यांची विक्री
केल्या प्रकरणी औरंगाबाद महापालिकेतला मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन
एमआयएम पक्षाचा
नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला भिवंडी गुन्हे
शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला
काल दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या वाहन चोरांच्या टोळीपैकी काही जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक
केली आहे, या टोळीने पाचशेहून अधिक वाहनं चोरून विकल्याचा
अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी ७० तर औरंगाबाद पोलिसांनी दोन वाहनंही जप्त
केली आहेत.
****
मराठवाड्यात काल उस्मानाबाद तसंच लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं
हजेरी लावली. दरम्यान, येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद इथले भारतीय
जनता पक्षाच्या ओबीसी
सेलचे जिल्हा सरटिणीस संजय फतेलष्कर यांच्यावर काल चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाठा
विद्यापीठ परिसरात काल सायंकाळच्या
सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले फतेलष्कर
यांच्यावर घाटी
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment