Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणं आवश्यक असून,
शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा, असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी
व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत
होते. सकारात्मक विचार विकासासाठी आवश्यक
असून त्या साठी योगाभ्यास गरजेचा असल्याचं ते म्हणाले. तरुणाईनं आधुनिक जीवन शैली अंगीकारतानाच
योगाभ्यास देखील केला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
राज्यपाल
सी विद्यासागर राव यांनी राजभवन इथं एका विशेष योग सत्रामध्ये सहभाग नोंदवला. मुंबईत मंत्रालयात तसंच गेट वे ऑफ इंडिया परिसरात योगाभ्यास
करण्यात आला.
****
दरम्यान, उपराष्ट्रपती मुंबईहून पुण्याला
पोहोचले असून, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट
यांनी उपराष्टपतींचं विमानतळावर स्वागत केलं. पुण्यात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय
कृषी परिषदेचं उद्धाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार असून, पुणे
महापालिकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटानही त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणाचं उद्दीष्ट
गाठण्यासाठी योग हा एकमेव मार्ग असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आंतरराष्ट्रीय योग
दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांनी नवीन आणि स्वस्थ भारताच्या
निर्माणासाठी योगाशी समन्वय साधण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद इथं योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे
शहरात २४ ठिकाणी, तर ग्रामीण भागात सहा ठिकाणी योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बीड इथं जिल्हा योग संघटना आणि पतंजली
योग समितीच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुलावर कार्यक्रम घेण्यात आला, सुमारे एक हजारावर
विद्यार्थी तसंच योग अभ्यासक या कार्यक्रमात सहभागी झाले.
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित
योग शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. जिल्हा कारागृहातही कैद्यांसाठी
योग शिबीर घेण्यात आलं.
जागतिक योग दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस मुख्यालय
मैदानावर आयोजित कार्यक्रमात संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे सहभागी झाले होते.
वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात
योग अभ्यासकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला
****
राज्य
शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार‘ या
योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांतल्या एकशे सहा गावांतल्या तलावांमधला
आठ लाख अकरा हजार आठशे सतरा घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे धरणातला पाणीसाठा वाढण्यास, तसंच शेत जमीन सुपीक
होण्यास मदत होणार आहे.
****
मुसळधार पावसा मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जनजीवन
विस्कळीत झालं आहे. मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली
आहे. काही ठिकाणी पूलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या २४ तासात जिल्ह्यात
एक हजार ४४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
****
जम्मू-कश्मीरमध्ये
काल श्रीनगर जवळच्या गालंदर पंम्पोर परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी पोलिस वाहनावर हल्ला
केला. या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर
इतर दोन जण जखमी झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली असल्याची
माहिती सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.
****
देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीला अधिकृत मान्यता
द्यावी, अशी मागणी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
कडे केली आहे. यावर्षी नोव्हेंबर मध्ये होत असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद
ओडीशा भूषवणार असून, त्या आधी हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी असं
पटनाईक यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा निविदा स्पेन आणि भारत
सरकार द्वारे आणण्यात आली असून, या द्वारे दहा हजार मेगावॅटच्या निविदा पुढच्या महिन्यात
काढल्या जाणार आहेत. ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांनी नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
****
ठाण्यात
मुंब्रा इथं आज पहाटे लागलेल्या आगीत दहा गोदामं जळून खाक झाली. पहाटे चारच्या सुमाराला
खर्डी रस्त्यावरच्या एका गोदामाला आग लागून ती
पसरत गेली, त्यात आजूबाजूच्या इतर गोदामांनी पेट घेतला. या आगीत सुदैवानं, कसलीही जीवित हानी झाली नसल्याचं ठाणे महानगर पालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन
कक्षानं सांगितलं. अग्निशमन दलानं तीन बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं.
****
सोलापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसा पासून
पावसानं ओढ दिल्यानं, जिल्ह्यात आता पर्यंत फक्त चार टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या
आहेत. अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर तालुक्यात पेरण्या ठप्प झाल्या असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment