Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांमुळे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं सशक्तीकरण होत असून, दैनंदिन आयुष्यातल्या अनिश्चिततेचा
सामना करण्यासाठी त्यांना या योजनांची मदत होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. सामजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी नमो ॲपच्या माध्यमातून संवाद
साधताना ते आज बोलत होते. २०१४ पर्यंत केवळ पाच कोटी लोकांपर्यंत पोचू शकलेलं सामाजिक
सुरक्षा योजनांचं हे कवच आता पन्नास कोटी लोकांपर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं.
महिलांची अधिकाधिक खाती उघडली गेली असून आता त्या मुख्य आर्थिक प्रवाहात आल्याचंही
त्यांनी सांगितलं. गरिबांसाठी बँकांची दारं खुली करणं, छोट्या उद्योगांसाठी भांडवल
उपलब्ध करून देणं आणि गरिब आणि दुर्बल घटकांमध्ये उद्योजकतेला चालना देणं, यावर सरकारनं
भर दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा त्याच्या
मूळ रूपात कार्यान्वित राहण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार, सामाजिक न्याय
आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केला आहे. ते नवी दिल्लीमध्ये एका पत्रकार
परिषदे मध्ये बोलत होते. हा कायदा असाच ठेवण्यासाठी सरकार विधेयक किंवा अध्यादेश आणेल,
असंही त्यांनी सांगितलं.
****
आगामी सार्वजनिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा
कार्यकर्त्यांची धोरणात्मक बैठक घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज पश्चिम बंगालच्या
दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असून, जिथे दोन भाजपा कार्यकर्त्यांच्या
हत्या झाल्या, त्या पुरुलिया जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत.
****
येत्या एक जुलै पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर काही
प्रमाणात कमी होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते
काल पाटणा इथे एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनंतर,
ओपेक, या तेल उत्पादक देशांच्या संघटनेनं कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय
घेतला असून, येत्या रविवार पासून हे तेल बाजारात येईल, आणि त्यामुळे दरात घट होण्याची
अपेक्षा आहे, असं प्रधान यांनी सांगितलं.
****
सुरक्षा दलांनी जम्मू कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातून
जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केलं असल्याची माहिती
आज जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. गोपनीयरीत्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस
आणि केंद्रीय राखीव पोलिस दलानं काल संध्याकाळी सोपोरच्या फळबाजारात शोधमोहीम हाती
घेऊन या चार जणांना अटक केल्याचं, त्यांच्या कडची शस्त्रं जप्त केल्याचं तसंच त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ऑक्सिटॉसिन या औषधावर सरकारनं बंदी घातली असून या
औषधाचा वापर आता फक्त नोंदणीकृत रुग्णालयांमधून करण्यात येणार आहे. येत्या एक जुलैपासून
ही बंदी लागू होणार आहे.या औषधाच्या आयातीवरही ही बंदी लागू होणार आहे. आरोग्य मंत्रालयानं
एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली आहे. कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स
या एकाच कंपनीला घरगुती वापरासाठी हे औषध उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली असून,
ही कंपनी हे औषध फक्त नोंदणीकृत रुग्णालयांना थेट पुरवणार आहे.
****
लष्कराचं एक सुखोई विमान आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात
कोसळल्याचं वृत्त आहे. तांत्रिक
बिघाड झाल्यानं हे विमान पिंपळगाव
जवळच्या शिरवाडे फाट्याजवळ आज सकाळी साडेदहा वाजता कोसळलं. हे विमान पूर्णपणे जळाल्याचं
तसंच, या विमानातले तीनही वैमानिक पॅराशूटच्या सहाय्यानं खाली उतरल्यामुळे या अपघातात
कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यामध्ये, प्रसूतीदरम्यान माता-मृत्यूच्या दरात
अर्थात एमएमआर-मध्ये लक्षणीय घट झाल्यानं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या
हस्ते राज्य शासनाचा येत्या एकोणतीस तारखेला गौरव करण्यात येणार आहे. राज्यात एम एम
आरचं, या आधीचं दर एक लाख गर्भवतींमागे अडुसष्ठ, इतकं असणारं प्रमाण आता एकसष्ठ वर
आलं आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण,दर एक लाख गर्भवती महिलांमागे एकशे तीस मातामृत्यू,
असं आहे. याबाबतचं निर्धारित लक्ष्य महाराष्ट्रानं अतिशय कमी कालावधीत गाठल्यामुळे
राज्यशासनाचा हा गौरव होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment