Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
खटल्यांच्या वितरणा साठी सर्वोच्च न्यायालयानं
नवीन रोस्टर अधि सूचित केलं आहे. उन्हाळी सुट्टी नंतर दोन जुलै पासून हे नवं
रोस्टर लागू होईल. या नुसार सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठासमोर सामाजिक न्याय, निवडणूक, हिबियस कॉर्पस आणि न्यायालयाच्या
अवमान विषयक याचिकांबरोबरच सर्व जनहीत याचिकांची सुनावणी होईल. श्रम विषयक कायदे, अप्रत्यक्ष
कर, पर्सनल लॉ आणि कंपनी लॉ विषयक खटल्यांची सुनावणी
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर होईल.
****
मुंबई
इथं आज आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची तिसरी
वार्षिक बैठक केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत अर्थव्यवहार विभाग,
केंद्रीय अर्थ विभाग, आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंक सहभागी झाले
आहेत. योग्य पायाभूत सुविधा गुंतवणूकीच्या माध्यमातून शाश्वत भविष्य निर्माण
करण्यासाठी वैचारिक देवाण घेवाण या
वेळी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या या बैठकीत सहभागी होणार आहेत.
****
`तुम्हारी सुलू` चित्रपट २८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार - आयफा वितरणात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. बँकाक इथं काल या सोहळ्यात
इरफान खानला हैदर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार `मॉम` साठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर
प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक `हिंदी मिडियम` साठी साकेत चौधरी यांना,
सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटा साठी अमाल मलिम,
तनिष्क बागची आणि अखिल सचदेव यांना प्रदान करण्यात आला. पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये
काम करणारे अभिनेते अनुपम खेर यांना यावेळी विशेष योगदानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं.
****
सरकारनं आणखी १६ पोलाद उत्पादनांचा समावेश, गुणवत्ता
नियंत्रण आदेशाच्या कक्षेत केला आहे. या निर्णयामुळे देशात वापरली जाणारी ९० टक्के
पोलाद उत्पादनं या आदेशाच्या कक्षात येतील. या पूर्वी पोलाद मंत्रालयानं
कार्बन-पोलादची ३४ आणि स्टेनलेस स्टीलची तीन उत्पादनं अधिसूचित केली होती.
****
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई
शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान
होत आहे. सकाळी अकरा वाजे पर्यंत नाशिक विभागात
नाशिक जिल्ह्यात २२ पूर्णांक ३४. तर धुळे जिल्ह्यात
३२ पूर्णांक ३४ टक्के मतदान झालं. पालघर जिल्ह्यात सकाळी नऊ वाजे पर्यंत सात पूर्णांक
४९ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. संध्याकाळी पाच वाजे पर्यंत मतदान सुरु राहील. या निवडणुकीत ७१ उमेदवार
रिंगणात आहेत.
दरम्यान, नाशिक शहरातल्या बी डी भालेकर मतदान केंद्रावर
शिवसेना उमेदवार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे
समर्थकांत वाद झाला. पोलिसांच्या कारवाईनंतर आता मतदान शांततेत सुरु असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य सरकारनं लागू केलेल्या प्लास्टिक बंदीमुळे
प्लास्टिक उद्योगाला मोठा फटका बसल्याचं प्लास्टिक पिशव्या उत्पादकांच्या देशपातळी
वरच्या संघटनेचे सर चिटणीस निमित पुनमिया यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे प्लास्टिक उद्योगाचं १५ हजार कोटी
रुपयांचं नुकसान होण्याची तसंच तीन लाख बेरोजगार होण्याची शक्यता त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी
बोलताना व्यक्त केली.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार येत असलेल्या
३४४ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जोरदार
पाऊस असतानाही राज्याच्या विविध भागातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित आहेत. आज पहाटे
चार वाजता राज्याभिषेक सोहळा सुरू झाला, त्या नंतर ध्वजपूजन कऱण्यात आलं. रायगड जिल्हा
परिषद, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र
मंडळाच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला.
****
जालना शहरातल्या कन्हैय्या नगर भागात मध्य रात्रीच्या
सुमारास वाहनाला धक्का लगल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. वादाचं पर्यावसन नंतर
दगडफेकीत झाल्यानं या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या
माहितीनुसार चंदनझीरा पोलिस ठाण्यात परस्परांविरोधी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल
करण्यात आला असून, २४ जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात
आला आहे.
****
राज्यात आज अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई
आणि उपनगरांमध्ये, तसंच धुळे जिल्ह्यात सकाळ पासून पाऊस सुरु आहे. वाहतुक व्यवस्था
विस्कळीत झाली आहे. रायगड जिल्हयात आज सकाळी कर्नाळा इथला एक पूल खचल्यानं मुंबई-गोवा
महामार्गावरची वाहतूक खोळंबली असून, ही वाहतूक आता अन्य मार्गानं वळवण्यात आली आहे.
पुढच्या २४ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. औरंगाबाद
शहर आणि परिसरात काही ठिकाणी तुरळक पावसाचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment