Friday, 29 June 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.06.2018 11.00




आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९   जून २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या निवासस्थानी देशातल्या ऊस उत्पादकांच्या एका शिष्टमंडळाशी संवाद साधणार आहेत. या शिष्टमंडळात देशभरातले दीडशे ऊस उत्पादक शेतकरी सहभागी असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या उपाययोजना आणि सरकारनं त्यासाठी उचललेली पावलं यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

****

भारतीय बँकांना महामार्ग क्षेत्रात मोठी संधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मुंबईमध्ये देशभरातल्या अग्रणी बँकांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. यावेळी महामार्ग क्षेत्रातल्या प्रकल्पांबाबत बँकप्रमुखांना माहिती देण्यात येणार आहे.

****

जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात लष्कराच्या गस्ती पथकावर ग्रेनेडचा हला झाल्याचं वृत्त आहे. लष्करानं या भागाला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. तर, कूपवाडा जिल्ह्यातही भारतीय सैन्याची अतिरेक्यांशी चकमक सुरू असून,या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय-नं कॅनरा बँकेच्या दोन माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांवर मुंबईच्या एका विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हिरे व्यापारी जतिन मेहता यानं या बँकेचं एकशे शेहेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याच्या गुन्ह्याच्या संदर्भात अविनाश महाजन आणि सुंदर राजन रामन या माजी संचालकांसह अन्य पंधरा अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयनं हे आरोपपत्र दाखल केलं आहे.

****

श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची तिसरी तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. सततच्या पावसानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले असल्याच्या स्थितीतही भाविकांनी ही यात्रा सुरू ठेवली आहे. दरम्यान, श्रीअमरनाथ यात्रेवरचं एक विशेष टपाल तिकीट काल जम्मूकाश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी जारी केलं. या तिकिटावर श्रीअमरनाथ यात्रेचा संपूर्ण मार्ग दाखवण्यात आला आहे.

//**********//


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...