Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
उत्तर प्रदेशातल्या, संत कबीर जिल्ह्यात मगहर इथं आयोजित दोन दिवसीय ‘कबीर महोत्सवाचं उद्घाटन केलं.
संत कबीर यांच्या ६२० व्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
आहे. पंतप्रधानांनी संत कबीर यांच्या समाधीला अभिवादन केलं. संत कबीरांच्या भूमीत येवून
आपण धन्य झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी संत कबीराच्या कार्याचा गौरव केला. संत कबीरदास
अकादमीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. दोन दिवसांचा हा कबीर महोत्सव केंद्रीय सांस्कृतिक
कार्य मंत्रालयानं आयोजित केला असून त्यात लोकसंगीत, नृत्य आणि संगीत नाटकांचा समावेश
आहे. देशभरातले कलाकार यात सहभागी होणार आहेत.
****
राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प होणं गरजेचं असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात
बोलत होते. या प्रकल्पाला काहींचा विरोध आहे, पण चर्चेनं हा वाद सोडवण्यात येईल, असं
फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार इथं उभारण्यात
येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी गेल्या सोमवारी सौदी
अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य
करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
****
जम्मू काश्मीर मध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे
बालताल आणि पहलगाम इथल्या आधार शिबिरातून आज सुरू होणारी अमरनाथ यात्रा सुरू होवू शकली
नाही. दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच यात्रा सुरू होणार
असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.
****
कोणतंही मूल कुपोषणाला बळी पडणार नाही
हे देशाला सुनिश्चित करावं लागेल, असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार
यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली इथं `पोषण अभियानात तंत्रज्ञानाची भागीदारी` विषयावरील
एका चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना बोलत होते. प्रत्येक मुलाला आवश्यक पौष्टिक आहार
उपलब्ध करून दिला पाहिजे. कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी नीती आयोग शक्य ते
सर्व प्रयत्न करेल, असंही नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी यावेळी सांगितलं.
****
पाकिस्तानमधील बंदी घालण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहीदीनसारख्या
संघटना जम्मू काश्मीरमध्ये मुलांना भरती करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस
अँटोनीयो गुतरेस यांनी मुलं आणि सैन्य दलांमधील संघर्षावरच्या वार्षिक अहवालात हे नमूद
केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलं आणि अतिरेक्यांच्या चकमकीतील तीन प्रकरणांत
या संघटना मुलांचा वापर करत असल्याचं स्पष्ट झाले आहे. यातील दोन चकमकी जैश ए मोहम्मद
आणि एक हिजबुल मुजाहीदीनशी संबंधीत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ दरम्यान या अहवालानुसार
जगभर अशा संघर्षाँमध्ये दहा हजारांहून अधिक मुलं मारली गेली अथवा अपंग झाली आहेत, तर
आठ हजारांहून अधिक मुलांना यात लढण्यासाठी भरती करण्यात आलं.
****
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी
आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं कार्य केलं, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी म्हटलं आहे.
अस्मितादर्श नियतकालिकाच्या अर्धशतकपूर्ती निमित्त
आज औरंगाबाद इथं आयोजित समारंभाचं उद्घाटन, आठवले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते
बोलत होते. औरंगाबाद इथं पानतावणे यांचं स्मारक उभारण्यासाठी तसंच पानतावणे यांच्या
नावानं शासनाचा पुरस्कार सुरू करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी
यावेळी दिलं.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर मुळे, अखिल भारतीय
मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अर्थतज्ज्ञ
डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अस्मितादर्श नियतकालीकाच्या माध्यमातून पानतावणे
यांनी, समाजाला जाती धर्माच्या पलीकडे घेऊन जाण्याचं कार्य केलं, असं मत श्रीपाद जोशी
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या
मन्याळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं 25 हजार वृक्षांची लागवड केली आहे. पाऊस पडल्यानंतर
उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या बियांचं जवळच असलेल्या
डोंगरावर मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली रोपण केलं. यामध्ये सुबाभूळ, बोर, चिंच,
यासारख्या विविध जातींच्या बियांचा समावेश आहे. या उपक्रमात शिक्षकांसह गावातले सरपंचही
सहभागी झाले होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस सुरू
आहे, या पावसामुळे जिल्ह्यातले जवळपास १२ बंधारे
पाण्याखाली गेले आहेत. आज पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र भोगावती आणि कासारी
या नदीवरील बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चंदगड तालुक्यातील
दीड टी.एम.सी क्षमतेचं घटप्रभा धरण आज पूर्ण क्षमतेनं भरलं. दरम्यान,पंचगंगा नदीची
पाणी पातळी वीस फुटांपर्यंत पोहचल्यानं घाटावरील सर्व मंदीरं पाण्याखाली गेली आहेत.
भुस्खलनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, जिल्हृा प्रशासनानं आंबवडीकर गावातल्या सतरा
कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चँपियन्स चषक हॉकी स्पर्धेत नेदरलँडमधील ब्रेडा इथं
भारताचा आज बेल्जियमविरुद्ध सामना होणार आहे. रात्री साडे आठ वाजता हा सामना होईल.
दोन सामन्यांत विजय आणि एकामध्ये पराजय पत्करावा लागल्यानं, भारतीय संघ, सहा संघाच्या
या स्पर्धेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment