Thursday, 21 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 21 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन धोरण अवलंबण्याची गरज, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पुणे इथं आज दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. संसद, नीति आयोग आणि माध्यमांनी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं सांगून उपराष्ट्रपतींनी, कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढवणं आणि विपणन प्रक्रियेत सुधारणा करण्यावर भर दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृषी क्षेत्रात सातत्य राखण्यासाठी आता हरित क्रांतीकडून सदाहरित क्रांतीकडे जाण्याची गरज व्यक्त केली.

****

जागतिक योग दिवस आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहरांडून इथं योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. केंद्रीय मंत्र्यांनी देशातल्या विविध ठिकाणी योगाभ्यास केला. राज्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये झालेल्या योगाभ्यासात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. औरंगाबाद इथं यानिमित्त आयोजित सायकल रॅलीला विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यांनतर विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात बागडे यांनी, योग हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यानं, तो नियमितपणे करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. 

लातूर इथं आयोजित योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी, योग साधनेतून मानसिक कणखरपणा येऊन आरोग्य ही उत्तम रहातं, असं मत व्यक्त केलं.

यवतमाळ, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

सरकारनं चौथ्यांदा खाद्य तेलावरचं आयात शुल्क वाढवून, सगळ्या तेलबियाचं आयात शुल्क एकसारखं ४५ टक्के केलं आहे. त्यामुळे बाजारात तेलबियांचे दर सुधारतील असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात यावर्षी खरीप हंगामात सोयाबिनचा पेरा जवळपास ४२ टक्के होणार असून, शेतकऱ्यांना सोयाबिनला जवळपास चार हजार २०० रूपयांपर्यंत भाव मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांसाठी दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करण्याची तसंच जगातल्या गरीब देशांना दूध पावडरची भुकटी निर्यात करण्याची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बळावला आहे, मात्र सरकार नागरिकांना योग करायला सांगत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद इथं आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे, पण प्रत्यक्षात दहा हजार कोटींची देखील कर्जमाफी मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. बाजार समित्यांसमोर शेतकरी हरभरा, तूरीच्या गाड्या घेऊन उभा आहे, मात्र त्याची खरेदी केली जात नाही, असंही ते यावेळी म्हणाले.   

****

लातूर शहरात पाणी पुरवठ्याबाबतचं योग्य नियोजन करून तातडीनं प्रायोगिक स्तरांवर नळांना मीटर लावून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांची भेट घेऊन, पाणी पुरवठ्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. लातुरकरांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं, या उद्देशानं मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम करण्यात आल्यानं धरणात मुबलक साठा आहे, मात्र तरीही लातूर शहरात आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो. यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणाला सहभागी होता येणार असून, उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जिल्हा परिषद गणाला अनुक्रमे दहा आणि ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केलं आहे. २५ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार या अभियानाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

****

No comments: