Wednesday, 22 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता.

****

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचं आज नवी दिल्ली इथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यानं आज पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १९७२ मध्ये कामत यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकोणिसशे शंहात्तरला त्यांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. १९८४ ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. २००९ ते २०११ या कालावधीत ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. २०१४ च्या निवडणुकीत मुंबई मतदारसंघात शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.

****

 त्याग आणि समर्पणाची शिकवण देणारा ईद उल जुहा - बकरी ईदचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या दिवशी त्यागाची भावना जागृत होते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस समाजात बंधुभाव वाढवेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. तर राज्यपालांनी आपल्या संदेशात, हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो असं म्हटलं
आहे.

****

 औरंगाबाद शहरात प्राप्तीकर विभागानं मोठी कारवाई करत शहरातल्या व्यवसायिकांच्या पाच ठिकाणांवर छापे मारून मालमत्तेचं मोजमाप केलं. छाप्यात दोन बांधकाम व्यावसायिक, एका उद्योगसमूहाच्या मालकासह अन्य दोन जणांचा समावेश आहे.
या कारवाईबाबत प्राप्तीकर विभागानं अतिशय गुप्तता पाळली, या कार्यवाईत  प्राप्तीकर विभागातले ५० पुरूष आणि सहा महिला अधिकाऱ्यांसह १०० पेक्षा अधिक जण सहभागी आहेत.

*****

***

No comments: