Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
वस्तु
आणि सेवा कर - जीएसटी देशातली आतापर्यंतची सर्वात व्यापक कर सुधारणा असल्याचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय महसूल सेवेच्या ६८व्या तुकडीला
संबोधित करताना ते बोलत होते. जीएसटी प्रणाली यशस्वीरित्या लागू करण्यात आली असून,
यामुळे अर्थव्यवस्था आणि प्रामाणिक करदात्यांना लाभ होईल, असं ते म्हणाले. देशाची कर
व्यवस्था न्यायपूर्ण, कार्यक्षम, विश्वासू आणि समानतेवर आधारित असली पाहिजे, असंही
राष्ट्रपती म्हणाले.
****
देशातल्या
बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच अधिकारात राहतील, अशी ग्वाही केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. जवाहरलाल
नेहरू बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढल्या काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना
रोजगार उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं. सागरमाला कार्यक्रमांतर्गत तीन लाख कार्यारंभ
आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत आणि त्या अंतर्गत १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इंडियन मर्चट्स चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरी
यांनी गंगा नदी पुनरुज्जीवनीकरणाबाबत माहिती दिली. पुनर्नवीकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून
संपत्ती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.
****
केंद्रीय
पर्यावरण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्ली इथं वन संरक्षणाला चालना देऊन, हवामान
बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय धोरण जारी केलं. या धोरणाअंतर्गत वन क्षेत्र
कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळण्यासाठी राष्ट्रीय अभियानाची सुरुवात
केली जाणार आहे. हवामान बदलाची समस्या कमी करण्यासाठी भारतानं काही उपाययोजना करुन
अडीच ते तीन अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन थांबवलं असल्याचं हर्षवर्धन यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यात
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न
करावेत, तसंच अत्याचार प्रतिबंधक कायदा-ॲट्रॉसिटीची गुणवत्तापूर्ण आणि योग्य अंमलबजावणी
व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई इथं आज राज्यस्तरीय
उच्चाधिकार दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दाखल गुन्हा आणि
तपास याविषयीची गुणवत्ता वाढवण्यासाठी गृह विभागानं समन्वयानं प्रयत्न करावेत, असंही
मुख्यमंत्री म्हणाले.
****
दरम्यान,
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भातही बैठक आयोजित
करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यात गणेशोत्सव अतिशय उत्साहात
आणि आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा, असे निर्देश
त्यांनी यावेळी दिले. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाना देण्यात येत असल्याची
माहिती या बैठकीत देण्यात आली.
****
राज्य
शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून भारतीय स्टेट बँकेनं महाराष्ट्र स्तरावर
‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून, यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित कर्जावर
५० टक्के सुट दिली आहे. प्रामुख्यानं कृषी, कृषी पुरक आणि लघु उद्योगांचा यात समावेश
आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसलेल्या परंतु स्वत:च्या हिश्शाची रक्कम भरू न
शकलेल्या राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मोठ्या प्रमाणवर पीक कर्जाची
थकबाकी असलेल्या बुलडाणा, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे.
****
औरंगाबाद
जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी
आता आमरण उपोषण सुरू केलं आहे. कॉग्रेसनं गेल्या दोन ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
चक्री उपोषणाला सुरूवात केली होती. आता हे उपोषण कालपासून आमरण उपोषणात परिवर्तित केल्याची
माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सरकारकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण
सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण
काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
****
बुलडाणा
जिल्ह्यात शासकीय दरानुसार अधिकाऱ्यांनी दूध खरेदी करण्यास नकार दिल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी
विकण्यासाठी आणलेल्या दुधानेच अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक घातला. जिल्ह्यातल्या चिखली
तालुक्यात आज ही घटना घडली.
****
इंडोनेशिया
इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारत आणि मलेशिया
यांनी उपान्त्य फेरीत प्रत्येकी दोन गोल केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे
या सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर निश्चित केला जात आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा
सुवर्ण पदकासाठीचा सामना उद्या जपान विरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment