आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता.
****
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं आज पहाटे दिल्लीतल्या
अपोलो रुग्णालयात निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार
कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी १४ भाषांमधल्या ८० वृत्तपत्रांमध्ये
वार्तांकन तसंच स्तंभलेखन केलं आहे. नय्यर यांचे बियाँड द लाईन्स, इंडिया आफ्टर नेहरू, वॉल
ॲट वाघा, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आज दुपारी दिल्लीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
केले जाणार आहेत.
दरम्यान, नय्यर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ
कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त
केला आहे. नय्यर यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या लिखाणातून भाष्य केलं,
असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे
अस्थिकलश आज राज्यात विविध ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं भारतीय
जनता पक्षाच्या कार्यालयात विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे
यांच्यासह अनेक मान्यवरांनी, अटलजींच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण
केली, सर्वसामान्य नागरिकांनीही अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. हा अस्थिकलश दुपारी जालना इथं तर उद्या शुक्रवारी
परभणी तसंच नांदेड शहरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर नांदेड
इथं गोदावरी घाटावर या अस्थींचं विसर्जन करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या शालेय विद्यार्थिनींनी
येत्या राखी पौर्णिमेनिमित्त देशाच्या सीमांवर रक्षणासाठी तैनात वीर जवानांना स्वतः
राख्या तयार करून पाठवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या विद्यार्थिनींनी जवानांसाठी
छान मजकूर असलेली पत्रं देखील पाठवली आहेत. या अभिनव उपक्रमातून शिक्षक आणि पालकांकडून
कौतुक होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात अनधिकृत फलकं लावणाऱ्यांवर फौजदारी
गुन्हा दाखल केला जाणार आहे. विविध कार्यक्रमांसह, घोषणा तसंच जाहिरातींसाठी लावलेली
फलकं, भित्तीपत्रकांमुळे होणारं विद्रुपीकरण थांबवण्याचा यामागचा उद्देश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment