आकाशवाणी,
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑगस्ट २०१८
सकाळी ११.०० वाजता.
****
भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या सर्व
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंधरा राज्यांचे मुख्यमंत्री
या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपशासित राज्यात आत्तापर्यंत झालेल्या कामकाजाचा या बैठकीत आढावा घेतला जाईल. आगामी लोकसभा आणि तीन राज्य विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
****
गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा
- सी सी टी एन एस या प्रणालीचा कायदा, आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी, तसंच गुन्ह्यांची
त्वरेनं उकल होण्यासाठी प्रभावी वापर करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. राज्यातल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या, अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्र्यानी
काल पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या जैतापूर
अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पविरोधी जनहक्क समितीनं काल केलेल्या जेल भरो
आंदोलनात ४०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण
यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचा साखरीनाटे ते माडबन असा पाच किलोमीटरचा मोर्चा
काढण्यात आला. या मोर्चाचं माडबन तिठा इथं सभेत रूपांतर झालं. जैतापूर प्रकल्प रद्द
होईपर्यंत प्रकल्पविरोधी लढा कायम ठेवण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यात बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनच्या
नुकसान झाल्यापोटी, एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस
पक्षाच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. खासदार राजीव सातव, आमदार
डॉ. संतोष टारफे, यावेळी उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ बुद्रुक, शामनगर आणि
रूई या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची नोटीस काल जारी करण्यात आली. येत्या २६ सप्टेंबर
रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment