Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २२
ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत इथल्या हिंदमाता चित्रपटगृहाजवळ
असलेल्या क्रिस्टल टॉव्हर या निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी आग लागली.
काही रहिवासी जिन्यात अडकले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बचाव पथकानं काही लोकांना सुखरूप बाहेर काढलं, मात्र या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, सोळा लोक जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण बारा गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी
प्रयत्न करत आहेत.
****
माजी
पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी देशातल्या सर्व नद्यांमध्ये
विसर्जित करण्यात येणार असून, आज नवी दिल्ली इथं त्यांचे अस्थिकलश भाजपच्या
सर्व प्रदेशाध्यक्षांकडे सोपवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजानथ
सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि
वाजपेयी यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. प्रत्येक राज्याची राजधानी
तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये अस्थिकलशाची यात्रा काढल्यानंतर, अस्थींचं विसर्जन
केलं जाणार आहे.
****
काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत
यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. कामत
यांच्या निधनानं एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला, अशा
शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कामत यांचं आज सकाळी दिल्लीत
निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते.
****
केरळच्या
पूरग्रस्त भागातल्या परिस्थितीवर नियमितपणे लक्ष असल्याचं, केंद्रीय
आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात धोरणात्मक आरोग्य केंद्रं
सक्रीय केली असून, त्याद्वारे केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी नियमित संपर्क
साधला जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
केंद्र
सरकारनं वस्तू आणि सेवा कराअंतर्गत जुलै महिन्याचं तीन ‘ब’ हे
विवरण पत्र भरण्यासाठीची मुदत २४ ऑगस्टपर्यंत
वाढवली आहे. याआधी ही मुदत २० ऑगस्टपर्यंत होती. वस्तू आणि सेवा करासंबंधी विवरणपत्र
भरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री पियुष
गोयल यांनी सांगितलं.
****
‘उडान’ योजनेअंतर्गत
परवडणाऱ्या दरातल्या हवाई वाहतूक सेवेचा लाभ आता आंतरराष्ट्रीय प्रवासाकरताही मिळणार
आहे. त्यासाठीच्या उडाण विस्तार योजनेचा मसुदा काल केंद्र सरकारनं सादर केला. राज्य
सरकारांकडून निर्धारीत आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही सेवा दिली जाईल. या कार्यक्रमाअंतर्गत
२०२७ पर्यंत, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेची तिकीट विक्री, २०
कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य
ठेवण्यात आलं आहे. याअंतर्गत तिकीटांवर
सवलत देता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक निधीची स्थापना करावी असा प्रस्ताव
मांडण्यात आला आहे.
****
मुंबई बॉम्बस्फोटातला फरार आरोपी दाऊद इब्राहीमचा साथीदार जबीर मोती याला जामीन द्यायला
ब्रिटनमधल्या न्यायालयानं नकार दिला आहे. जबीर याला हवाला आणि खंडणीप्रकरणात मागच्या
आठवड्यात लंडन इथं अटक केली होती. जबीर याच्या विरोधात दहशदवाद्यांशी
संबंध, हवाला, खंडणी आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार असे गंभीर आरोप
आहेत, त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट
केलं.
****
अठराव्या
आशियायी क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी अधिकाधिक पदकं मिळवण्याचा भारतीय खेळाडूंचा
प्रयत्न असेल. वुशू क्रीडा प्रकारात भारताची जवळपास चार
पदकं निश्चित झाली आहेत. हॉकी स्पर्धेत
भारतीय पुरुष संघाचा सामना आज हाँगकाँग
सोबत होणार आहे. नेमबाजीत आज २५ मीटर पिस्टल प्रकारात
मनू भाकेर, ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात अंजुम मौदगील यांच्यासह
एन.गायत्री आणि राही सरनोबत हे नेमबाज आज आपापले सामने खेळतील. जिम्नॅस्टिक मध्ये दीपा
कर्माकर, प्रणती नायक आणि अरुणा रेड्डी यांची
आज अंतिम फेरीसाठी स्पर्धा असेल. भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघानं उपांत्य
फेरीत प्रवेश केला आहे. तर नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळने अंतिम फेरीत स्थान मिळवलं
आहे.
****
जालना आणि परभणी जिल्ह्याच्या सीमारेषेवर उस्मानपूर
ते सातोना दरम्यानच्या रेल्वे मार्गावर उद्या २३, २५, २८ आणि ३० ऑगस्टला सकाळी आठ ते
११ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसोल-नांदेड आणि मनमाड-काचीगुडा या
प्रवाशी रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयानं कळवलं आहे.
****
ईद - उल - जुहा अर्थात बकरी ईद निमित्त आज ठिकठिकाणी
नमाज अदा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या पोलीस कवायत मैदानावर मौलाना
मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत मुख्य नमाज अदा करण्यात आली, तसंच इतर १४
ठिकाणी आणि प्रार्थनास्थळांमध्ये दुवा आणि नमाज पठण करण्यात आलं. नाशिक शहरात ईद निमित्त
११ तात्पुरत्या कत्तल ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद इथंही ठिकठिकाणी
मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.
*****
***
No comments:
Post a Comment