Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची
शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
v राज्यात एक हजार दुष्काळी गावांमध्ये दहा हजार लीटर क्षमतेच्या
पाण्याच्या टाक्या बसवणार
v एस टी च्या शिवशाही शयनयान बसच्या प्रवास भाड्यात कपात
v स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीच्या मुंडे डॉक्टर दाम्पत्याला
दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
आणि
v न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात
भारताचा सात गडी राखून विजय
*****
लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका एकाच
वेळी घेण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. कॉंगेस
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता
औरंगाबाद आणि पुणे इथं बोलतांना वर्तवली होती, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल
पालघर इथं वार्ताहरांशी बोलतांना, राज्यसरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं स्पष्ट
केलं. विधानसभा बरखास्त करण्याचे कोणतेही संकेत शासनाला मिळाले नसून दोन्ही निवडणुका
आपापल्या नियोजित वेळेतच होतील असा खुलासाही त्यांनी केला.
****
राज्यातल्या दुष्काळी भागातल्या एक हजार गावांमध्ये
दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसवण्याचा निर्णय सरकारनं घेतला
आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनानं केलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक काल मुंबईत
झाली, यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि अहमदनगर
या सहा जिल्ह्यात आठ गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून,
यामध्ये आतापर्यंत सात हजार ३७५ जनावरं दाखल झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मंडळस्तरावर
जनावरांची संख्या वाढल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात
आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****
आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार
असून, समविचारी प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
सुधीर सावंत यांनी सांगितलं. काल मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, सावंत यांनी,
जागा वाटपाबद्दल १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईल, अशी माहिती दिली.
****
लोकसभेत काल २०१९च्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा
सुरु झाली. चर्चेला सुरुवात करताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी, दोन हेक्टर
जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीही
फायदा होणार नसल्याचं सांगितलं. सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग
ठाकूर यांनी, नवभारताच्या निर्माणासाठी केलेल्या अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पातून
दिसून येत असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं अर्थसंकल्पाला
पाठिंबा दिला.
दरम्यान, राफेल खरेदी प्रकरणावरून विरोधकांनी लोकसभेत
जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी
स्थगित करण्यात आलं. त्यामुळे अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.
राज्यसभेत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी राफेलचा
मुद्दा लावून धरला, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित
केला, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्थगन प्रस्तावानुसार चर्चा घ्यायला नकार दिला.
त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
राफेल
लढाऊ विमान खरेदीप्रकरणी एका
वृत्तपत्रातूल प्रसिद्ध झालेलं
वृत्त निराधार असल्याचं, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेला मजकूर हा केवळ तत्कालीन
संरक्षण सचिवांच्या निवेदनावर आधारीत असून त्यामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या
निवेदनाकडे दुर्लक्ष केलं आहे, असं त्यांनी काल लोकसभेत सांगितलं.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना, नोकरी
आणि शिक्षणात, दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला, आव्हान देणाऱ्या याचिकेवर, सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला, स्थगिती
देणार नसल्याचंही, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****
महाराष्ट्रात धुम्रपानाचं प्रमाण देशात सर्वात कमी
असल्याचं, जागतिक प्रौढ तंबाखू सर्व्हेक्षण २०१६-१७ मध्ये आढळून आलं असल्याचं आरोग्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत सांगितलं. ‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत २ हजार
७५५ शाळा तंबाखू मुक्त करण्यात आल्याचं सांगून राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच
खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विभागामार्फत जनजागृती
करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक
पदांसाठी आता हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिला आणि अवजड वाहन
चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असलेले पुरूष उमेदवारही अर्ज करु शकतील, असं परिवहन मंत्री
आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं. महिला उमेदवारांना
शारिरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. राज्यात सध्या ८ हजार २२ चालक तथा
वाहक पदांची भरती सुरु आहे. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी
संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा होणार आहे.
****
राज्यात असलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसंच लांब
पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर आणि माफक दरात व्हावा या उद्देशानं महामंडळानं वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या प्रवास भाड्यात
कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात
आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी केली. कमी झालेले नवीन दर येत्या १३
फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. सध्या महामंडळातर्फे राज्यातल्या विविध ४२
मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या बहुचर्चित स्त्री
भ्रूण हत्येप्रकरणी परळीचे डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना जिल्हा आणि
सत्र न्यायालयानं काल दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावत साडे चार लाख रुपयांचा दंडही
ठोठावला. २०१२ मध्ये मुंडे यांच्या दवाखान्यात अवैध गर्भपात करताना विजयमाला पट्टेकर
या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. सदोष मनुष्यवध तसंच प्रसुतीपूर्व
अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्यान्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. मुंडे
दांपत्यासह मृत विजयमाला पट्टेकर यांच्या पतीस देखील दहा वर्षाची शिक्षा सुनावली असून,
उर्वरित दहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
****
राज्यात काल भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अकरा वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात पुण्याचे क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त सुनील
केंद्रेकर यांची औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे, तर डॉ. पुरुषोत्तम
भापकर यांची त्यांच्या जागी क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान
ऑकलंड इथं झालेला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. प्रथम
फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित षटकांत आठ बाद १५८ धावा केल्या. भारतीय
संघानं हे लक्ष्य एकोणिसाव्या षटकात सात गडी राखून पूर्ण केलं. रोहीत शर्मानं ५०, ॠषभ
पंत ४० तर शिखर धवननं ३० धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं
बरोबरीत आहेत.
त्यापूर्वी काल सकाळी महिलांच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी
सामन्यात भारतीय संघाला मात्र सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडच्या
महिला संघाकडे मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी आहे. दोन्ही संघांचा तिसरा आणि अंतिम
टी-ट्वेंटी सामना उद्या हॅमिल्टन इथं होणार आहे.
****
सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र
सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचं भारतीय
जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्मान भारत
योजने’अंतर्गत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या २१ हजार ३६ कुटुंबातल्या ९२
हजार ८७३ लाभार्थ्यांना कुटुंब पत्र वाटप उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत
होते.
****
मराठवाड्यातली दुष्काळाची व्यथा युवकांनी शिक्षणाच्या
माध्यमातून दूर करावी, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मराठवाडास्तरीय संमेलनात ते बोलत होते.
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी युवकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. परिषदेचे
राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यावेळी उपस्थित होते. या संमेलनात विविध विषयावर तज्ज्ञांनी
मार्गदर्शन केलं.
****
दोन महिन्याचं थकीत वेतन तत्काळ द्यावं, या प्रमुख
मागणीसह विविध मागण्यांसाठी लातूर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी काल महापालिकेसमोर
ठिय्या आंदोलन केलं. पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन
चर्चा केली आणि आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सायंकाळी कर्मचाऱ्यांनी
आंदोलन मागे घेत, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र इतर कामकाजाबाबत
सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातले शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या
पार्थिव देहावर काल चिखली तालुक्यातल्या सावरगाव डुकरे या त्यांच्या मूळ गावी शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधल्या सियाचिन इथं कर्तव्य बजावत
असताना त्यांना वीरमरण आलं.
****
जालना इथले प्रसिद्ध उद्योजक शांतीलाल पित्ती यांच्या
पार्थिव देहावर काल जालना इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पित्ती यांचं गुरूवारी हृदयविकाराच्या
धक्यानं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. जालना इथं पोलाद उद्योग उभारणीत त्यांचा मोलाचा
वाटा आहे.
****
हिंगोली इथं उद्या अटल महाआरोग्य मोफत शिबिराचं आयोजन
करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड लाखावर गरजू रूग्णांनी तपासणीसाठी नोंदणी केली आहे.
सकाळी आठ वाजेपासून शिबिराला सुरूवात होणार आहे. सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार करण्यात
येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment