Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
विरोधकांनी विविध मुद्यांवरुन केलेल्या
गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधीत झालं.
राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच समाजवादी पक्ष आणि
बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशात अवैध दारुच्या सेवनानं काही जणांचा
मृत्यू झाल्याचा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. मात्र सभापती व्यंकय्या नायडू यांनी
हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी नाकारली.
या गदारोळात आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी
अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक २०१९ सादर केलं, तर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा
स्वराज यांनी, अनिवासी भारतीय विवाह नोंदणी विधेयक २०१९ सादर केलं. काँग्रेसच्या सदस्यांनी
यावर आक्षेप घेत, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन गदारोळ केला. गदारोळ वाढत गेल्यानं
सभापतींनी राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
****
लोकसभेत कामकाज सुरु होताच विविध मुद्दे उपस्थित
करत विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास
सुरु करताच, काँग्रेस नेते के के वेणुगोपाल यांनी, भारतीय जनता पक्ष, कर्नाटकात आमदारांना
पक्षात प्रवेशासाठी, प्रलोभन देत असल्याचा आरोप केला. भाजप सदस्यांनी हा आरोप फेटाळून
लावताच, काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी सुरुवात केली. या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा
महाजन यांनी, सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं.
कामकाज पुन्हा
सुरू झाल्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुद्द्याकडे
सदनाचं लक्ष वेधलं, भाजपचे खासदार सदानंद
गौडा यांनी, या आरोपांचं खंडन करताना, काँग्रेसनं याबाबत चर्चेत आलेल्या ध्वनिफीतीचं,
सत्यापनही केलेलं नाही, अशी टीका केली.
अध्यक्षांनी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा पुकारताच,
काँग्रेस आणि इतर सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली.
****
केंद्रीय विद्यापीठात अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी
आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
****
अल्पसंख्याक समुदायाच्या राज्यवार जनगणनेत अल्पसंख्याक शब्द परिभाषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वात
बदल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला तीन महिन्यात
निर्णय घेण्यास सांगितलं आहे. भाजप नेते आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या
या याचिकेत, अल्पसंख्याक हा शब्द पुन्हा परिभाषित करण्याची गरज नमूद केली असून, या
समुदायाची राष्ट्रीय पातळीवर जनगणना करण्याऐवजी राज्य पातळीवर करावी, असं म्हटलं आहे.
हिंदू हे देशात जरी बहुसंख्य असले, तरी जम्मू काश्मीर आणि इशान्येकडच्या राज्यांमध्ये
हिंदू अल्पसंख्य आहेत, मात्र अल्पसंख्याकांसाठी असलेल्या लाभांपासून ते वंचित राहतात,
हे लक्षात घेऊन, अल्पसंख्याक शब्दाच्या व्याख्येवर पुनर्विचार करावा, असं त्यांनी म्हटलं
आहे.
****
शारदा
चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तृणमूल
काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष
यांची आज शिलाँग इथं, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय, सलग तिसऱ्या
दिवशी चौकशी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरु
आहे.
****
सामाजिक आर्थिक विकासात ऊर्जा हा महत्वाचा घटक असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नोएडा इथं आज पेट्रोटेक २०१९ या तेल आणि
वायू विषयक तेराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जागतिक
ऊर्जा क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून, ऊर्जेचा पुरवठा, स्रोत आणि त्याच्या वापराची
पद्धतही बदलत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद
केलं.
****
बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार इथं,‘
श्रीसंत शिरोमणी मन्मथ स्वामींचा जन्मोत्सव सोहळा काल साजरा झाला. राज्यभरातले भाविक
मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनाला आल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment