Friday, 15 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४३ जवान हुतात्मा

v साखरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिकिलो दोन रुपये वाढ

v राज्यातल्या १५१ दुष्काळी तालुक्यांना चौदाशे कोटी रुपये मदतीचा दुसरा हप्ता वितरित

आणि

v अमेझिंग औरंगाबाद या राष्ट्रगीताच्या चित्रफितीचं लोकार्पण

****



 जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघात हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दल-सीआरपीएफचे ४३ जवान हुतात्मा झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सीआरपीएफचे अडीच हजारहून अधिक जवान ७८ वाहनांमधून जम्मूहून श्रीनगरला जात असताना, पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपुरा इथं, अदील अहमद नावाच्या दहशतवाद्यानं, स्फोटकांनी भरलेली कार या या ताफ्यातल्या बसवर धडकवली. अनेक जवान या हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल यासंदर्भात तातडीची बैठक घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आज पुलवामा इथं जात आहेत.



रम्यान, या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत असून, अमेरिका, रशिया आणि फ्रान्सने दहशतवादाचं निर्मूलन करण्यासाठी ारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. ेपाळ, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या शेजारी देशांनीही दहशतवादाविरोधात भारतासोबत संयुक्त लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

****



 स्थावर मालमत्ता क्षेत्र बळकट करण्यासाठी पारदर्शी नियामक व्यवस्था आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं क्रेडाई युथकॉन या परिषदेत बोलत होते. कृषी क्षेत्रापाठोपाठ स्थावर मालमत्ता क्षेत्र सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाच्या विकासात या क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

****



 एनरॉन दाभोळ प्रकल्पासंदर्भातला खटला बंद करण्याची महाराष्ट्र राज्यसरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या कंपनीसोबत तत्कालीन राज्य विद्युत मंडळानं केलेल्या करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन - सिटू संघटनेनं १९९७ साली, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, या प्रकरणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान, राज्य सरकारनं, मध्यंतरीच्या काळात या आरोपांबाबत झालेली कार्यवाही, तसंच एनरॉन दाभोल ऐवजी रत्नागिरी गॅस ॲण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड असा कंपनीत झालेला बदल, याबाबत माहिती देत, खटला बंद करण्याची विनंती केली, मात्र न्यायालयानं ती अमान्य करत, याबाबत येत्या १३ मार्चला पुढची सुनावणी ठेवली आहे.

****



 केंद्र सरकारनं साखरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली आहे. देशभरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी साखर कारखान्यांना अदा करता यावी, यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो २९ रुपयांवरुन ३१ रुपये झाला आहे. कारखान्यांनी खुल्या बाजारात घाऊक व्यापारी तसंच शीतपेयं आणि बिस्कीट कंपन्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना, साखर प्रतिकिलो ३१ रुपयांपेक्षा कमी दरानं विक्री करू नये, असं केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. जानेवारी अखेर साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची थकबाकी वीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांची, निवडणूक आयुक्त पदी  नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह अशोक लवासा आणि चंद्रा हे दोघे निवडणूक आयुक्त असतील.

****



 निवडणुकी संदर्भातल्या बातम्या देतांना देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि भाषेच्या विविधतेबाबत जागरुक राहण्याचं आवाहन प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आकाशवाणी आणि दूरदर्शन वृत्त विभागातर्फे नवी दिल्ली इथं दोन दिवसीय संमेलनात ते काल बोलत होते. `पेड न्यूज` च्या धोक्याबाबत सजग राहण्याचं आवाहनही सूर्यप्रकाश यांनी यावेळी केलं. या संमेलनात देशभरातील प्रादेशिक वृत्त विभागाचे अधिकारी आणि वार्ताहर भाग घेत आहेत.

****



 राज्यातल्या १५१ दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठीचा जवळपास चौदाशे कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शासनानं काल वितरित केला. मदत आणि पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी काल ही माहिती दिली. या दुसऱ्या हप्त्यात, औरंगाबाद विभागाला पाचशे पंचवीस कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत आशिष बारकूल हा सर्वसाधारण गटातून पहिला आला आहे. मागासवर्गीय गटातून महेश जमदाडे यानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे दोघेही सोलापूरचे विद्यार्थी आहेत. महिला गटातून पुण्याची स्वाती दाभाडे पहिली आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती.

****



 बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. देऊळगाव राजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यप्रशासकीय इमारतीच्या निर्माणासाठी तीन कोटी २० लाख रुपये खर्च झाला आहे.



 देऊळगाव राजाच्या सु‍शोभकरणासाठी सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केली.



 या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी, सिंदखेडराजा इथं, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं, दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशिम इथला दौरा रद्द करून, मुख्यमंत्री काल औरंगाबाद मार्गे मुंबईला परतले.

****



 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल दुपारी अहमदनगर शहरातल्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अण्णांना किमान दोन दिवस रूग्णालयातच उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहराने दिली. नुकत्याच केलेल्या उपोषणामुळे अण्णांचं वजन, जवळपास साडेचार किलोनं कमी झालं आहे.

****



 केंद्रय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षांना आजपासून सुरूवात होत आहे. येत्या तीन एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षा २१ फेब्रूवारी ते २९ मार्च दरम्यान होणार आहेत.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वारसा स्थळांचं दर्शन घडवणाऱ्या अमेझिंग औरंगाबाद राष्ट्रगीताच्या चित्रफितीचं लोकार्पण काल औरंगाबाद इथं करण्यात आलं. भारतीय पुरातत्व विभागाचे निवृत्त संचालक पद्मश्री के के मोहम्मद यावेळी उपस्थित होते. चंबळ खोऱ्यातल्या बटेश्वर इथल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कथा, बॅटल ऑफ बटेश्वरचं मोहम्मद यांनी सचित्र सादरीकरण केलं.



 औरंगाबाद इथले पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ.शिवकांत बाजपेयी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या, बीबी का मकबरा या चित्रकथारुप पुस्तकाचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं.

****



 लातूर जिल्ह्यातल्या १२९ महिला बचत गटांना भारतीय स्टेट बँकेच्यावतीनं जवळपास २ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते काल झालेल्या बचत गट मेळाव्यात  सर्व बचतगटांना कर्ज मंजूरीचे पत्र आणि कर्जाचे  धनादेश  वितरीत करण्यात आले.

****



 मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१९ सालचा ‘भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार’ वसई इथल्या साहित्यिक संगीता अरबुने यांना जाहीर झाला आहे. परिषदेनं काल एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली असून अकरा हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 ुवाहाटी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी व्ही सिंधू, अस्मिता चलिहा आणि नागपूरच्या वैष्णवी भाले यांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.



 रम्यान, सामन्यांचं कोर्ट समतल नसल्याच्या कारणावरून सायना नेहवालं सामना खेळण्यास नकार दिला होता, मात्र काही वेळानंतर झालेल्या सामन्यात सायनानं श्रुती मुंदडा हिचा पराभव करत, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.



 पुरुषांच्या गटात पी कश्यप आणि बी साईप्रणीत यांनीही उपांत्यपूर्व फेरीत तर लक्ष्य सेन आणि कौशल धर्मामर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सर्वोच्च मानांकन असलेला समीर वर्मा मात्र घोट्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...