Friday, 15 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज मंत्रिमंडळाच्या सुरक्षविषयक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली. हा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या उपायांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, या बैठकीत सहभागी झाले होते.

****



 दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतानं पाकिस्तानला फटकारलं असून, पाकिस्ताननं दहशवाद्यांना पाठिंबा देणं थांबवावं, आणि त्यांच्या भूमीतून कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना  सुविधा देणं बंद करावं, असं पाकिस्तानला बजावलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीनं निश्चित केलेल्या निर्बधांअंतर्गत, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरसह घोषित दहशतवाद्यांची सूची करण्याच्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय समुदायानं पाठिंबा द्यावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा केलं आहे. भारतात आणि इतरत्र दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी त्याचं पाकिस्तानातलं दहशतवादी जाळं आणि सुविधा वापरण्यासाठी पाकिस्तान सरकारनं मसूद अझरला मोकळं रान दिलं असल्याचं भारतानं म्हटलं आहे. पाकिस्तान नियंत्रित भागातून कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांवर बंदी घालण्याचं आवाहनही भारतानं केलं आहे. कालचा दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद असून, राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलायला भारत सरकार खंबीर आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांची, निवडणूक आयुक्त पदी  नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह अशोक लवासा आणि चंद्रा हे दोघे निवडणूक आयुक्त असतील.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरूवात होत आहे. येत्या तीन एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान होणार आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...