Friday, 15 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 काश्मीर मधल्या पुलवामा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यासारख्या घटना भारताला दुबळं बनवू शकत नाहीत आणि याला जबाबदार असणाऱ्यांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला दिला आहे. दिल्ली ते वाराणसी नव्या निम अतीजलद रेल्वे सेवा उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल, असं पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केलं. हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सह वेदना व्यक्त करताना त्यांनी, यासाठी जबाबदार असलेल्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. असे दहशतवादी हल्ले आपल्याला दुबळे बनवतील असं आपल्या शेजारी राष्ट्राला वाटतं परंतू त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असं नमूद करताना पंतप्रधानांनी, कालच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांचे आभार मानले. दहशतवाद ठेचण्यासाठी या देशांनी एकत्र यावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.



 दरम्यान, या हल्ल्यात केंद्रीय राखिव पोलिस दलाचे ४० जवान शहीद झाल्याचं स्पष्ट झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****





 भारतानं या हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाकिस्तानला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बहाल केलेला सर्वात आवडते राष्ट्र – मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढून घेतला आहे. यामुळं त्यांच्या देशातून येणाऱ्या मालावर अधिक सीमा शुल्क लादता येणार आहे.

****



 या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला भेट देणार आहेत. वरिष्ठ सुरक्षा आणि पोलिस अधिकाऱ्यांसह ते आढावा बैठका घेणार आहेत आणि सुरक्षाविषयक मूल्यमापन करून पुढली रणनीती ठरवणार आहेत. या हल्ल्याच्या तपासासाठी गृहमंत्रालय एनआयए आणि न्यायवैद्यक तज्ञांची पथकं पाठवणार आहे.

****



 या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी सूचना जारी केली आहे. हिंसा भडकावणारा, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा, राष्ट्रविरोधी भावनेला खतपणी घालणारा, किंवा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा आशय व्यक्त करणारं प्रसारण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असं त्यात म्हटलं आहे. केबल नेटवर्क नियामक कायद्यात नमूद केलेल्या कार्यक्रम आणि जाहीरात संहितेचं उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही मंत्रालयानं या वाहिन्यांना केली आहे.

****



 राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दावर राजकारण दूर सारून राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर देशाला सुरक्षित आणि बळकट बनवण्याचा आपण सर्वांनी दृढ संकल्प केला पाहिजे, असंही त्यांनी नमुद केलं.

****



 दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चात राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते.

****



 प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आजपासून सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना वयाची ६० वर्षं पूर्ण झाल्यावर दर महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. असंघटित क्षेत्रातल्या ज्या कामगारांचं मासिक उत्पन्न १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि ते १८ ते ४० या वयोगटात असतील ते कामगार या योजनेसाठी पात्र असतील, असं श्रम आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे.

****



 सक्तवसुली संचालनालयानं डीएसके समुहाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची ९०० कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. या प्रकरणात ३५ हजार ठेवीदारांची एक हजार १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके समुहाचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि मुलगा आरोपी आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गोठवलेल्या या मालमत्तांमध्ये जमिनी, इमारती, सदनिका, विमा पॉलिसी, बँक खात्यांमधल्या रोख ठेवींचा समावेश आहे. 

****


 जालना जिल्ह्यातल्या गोंदी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी आज सकाळी शासकीय निवासस्थानी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आाहे.

****


 पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं गुटखा बाळगल्याप्रकरणी एकाला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं ११२ दिवसांची पोलिस कोठडी आणि एक लाख दोन हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...