Thursday, 14 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याच्या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे किमान १८ जवान आज शहीद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारली आहे. श्रीनगर-जम्मू मार्गावर अवंतीपुरा भागात जवान प्रवास करत असलेल्या बसवर दहशतवाद्यानं स्फोटक असलेली मोटार आदळवून हा भयंकर स्फोट घडवून आणल्यानं हे जवान शहीद झाले. पीटीआयच्या वृत्तानुसार या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा इथला दहशतवादी आदील अहमद यानं हा स्फोट घडवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

****

स्थावर मालमत्ता क्षेत्राला मजबूत करण्यासाठी पारदर्शी नियामक व्यवस्था आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं क्रेडाई युथक़ॉन या परिषदेत बोलत होते. कृषी क्षेत्रानंतर सर्वात जास्त रोजगार स्थावर मालमत्ता क्षेत्र उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी नमुद केलं. देशाच्या विकासात या क्षेत्राची खूप मोठी भागीदारी असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

****

अत्यंत घातक आणि संसर्गजन्य अशा रोंगाचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं यकृत आणि पित्त विज्ञान संस्थान - आयएलबीएसच्या सहाव्या दिक्षांत समारोहात मार्गदर्शन करत होते. विश्व स्वास्थ संघटनेच्या अहवालावरून ६३ टक्के मृत्यू हे संसर्गजन्य रोगांमुळे होतात त्यामुळे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आणि श्वसनाच्या वाढत्या गंभीर आजारांना रोखणं खूप आवश्यक असल्याचं मत नायडू यांनी व्यक्त केलं. यासाठी शाळांमध्ये योग शिक्षणाला महत्व दिलं जावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

निवडणुकीसंदर्भातल्या बातम्या देतांना देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि भाषेच्या विविधतेबाबत जागरुक राहण्याचं आवाहन प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आकाशवाणी आणि दूरदर्शन वृत्त विभागातर्फे नवी दिल्ली इथं दोन दिवसीय संमेलनात ते आज बोलत होते. `पेड न्यूज` च्या धोक्याबाबत सजग राहण्याचं आवाहनही सूर्यप्रकाश यांनी यावेळी केलं. या संमेलनात देशभरातील प्रादेशिक वृत्त विभागाचे अधिकारी आणि वार्ताहर भाग घेत आहेत.

****

इंडिगो या देशातल्या सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीनं या महिना अखेरपर्यंत दरदिवशी सरसरी तीस विमानं उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे. विमानसेवेचे कर्मचारी आणि विमानवाहतूकीचा योग्य ताळमेळ साधण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. देशांतर्गत विमानसेवेत या कपंनीचा वाटा ४१ इतका असून, त्यांची विमानवाहतूक सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे सुरुळीत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिगोनं काल ४९ उड्डाणं रद्द केली होती.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. देऊळगाव राजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, देऊळगाव राजाच्या सु‍शोभिकरणासाठी सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केली. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या निर्माणासाठी तीन कोटी २० लाख रुपये खर्च झाला आहे.

****

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं आज दुपारी अहमदनगर शहरातल्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना किमान दोन दिवस रूग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. गेल्या महिन्यात अण्णांनी उपोषण केलं होतं यादरम्यान त्याचं जवळपास साडेचार किलो वजन कमी झालं आहे.

****

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षांना उद्यापासून सुरूवात होत आहे. या परीक्षा ३ एप्रिल पर्यंत चालणार आहेत. तसेच सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षा २१ फेब्रूवारी ते २९ मार्च दरम्यान होणार आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 04 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...