Friday, 8 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 08.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

राज्यातल्या दुष्काळी भागातल्या एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुंबईत आज दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनानं केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवताना नागरिकांना विशेषतः महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचं योग्य वितरण व्हावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि अहमदनगर या सहा जिल्ह्यात आठ गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये आतापर्यंत सात हजार ३७५ जनावरं दाखल झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास आणि संस्था अथवा व्यक्तींनी चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शवल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

लोकसभेत आज २०१९च्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली. चर्चेला सुरुवात करताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी, शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचा आरोप केला. दोन हेक्टर जमिन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचं ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग ठाकुर यांनी, नवभारताच्या निर्माणासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम पक्षानं अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला. सध्याच्या सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी काही पावलं उचलली असून, पिकांची किमान आधारभूत किंमतही वाढवली असल्याचं पक्षाचे खासदार टी.व्यंकटेश बाबू यांनी म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या बहुचर्चित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीचे डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावत साडे चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१२ मध्ये मुंडे यांच्या दवाखान्यात अवैध गर्भपात करताना विजयमाला पट्टेकर या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. सदोष मनुष्यवध तसंच प्रसुतीपूर्व अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्यान्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. मुंडे दांपत्यासह मृत विजयमाला पट्टेकर यांच्या पतीस देखील दहा वर्षाची शिक्षा सुनावली असून, उर्वरित दहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

****

सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या २१ हजार ३६ कुटुंबातल्या ९२ हजार ८७३ लाभार्थ्यांना कुटुंब पत्र वाटप उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते आज बोलत होते.

****

मराठवाड्यातली दुष्काळाची व्यथा युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून दूर करावी, असं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मराठवाडास्तरीय संमेलनात ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी युवकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यावेळी उपस्थित होते. या संमेलनात विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.

****

बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आज जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, निर्मल शौचालय, शौच खड्डे, अहिल्यादेवी सिंचन विहीर, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना, जलसंधारणाची कामं आदी कामांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

****

बुलडाणा जिल्ह्यातले शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या पार्थिव देहावर आज चिखली तालुक्यातल्या सावरगाव डुकरे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधल्या सियाचिन इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान ऑकलंड इथं झालेला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित षटकात आठ बाद १५८ धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य एकोणाविसाव्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...