Tuesday, 23 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे २१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं आहे. औरंगाबाद इथं २१ टक्के तर जालना इथं २३ टक्के मतदान झालं आहे. जळगाव, सांगली आणि सातारा इथं प्रत्येकी २१ टक्के मतदान झालं आहे. बारामती, रावेर इथं प्रत्येकी २२ टक्के तर रायगड इथं २४ आणि पुण्यात सुमारे १६ टक्के मतदान नोंदवलं गेलं. अहमदनगर, माढा मतदार संघात प्रत्येकी २० टक्के मतदान झालं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग २५ टक्के, कोल्हापूर २६ टक्के, हातकणंगले इथं २४ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडमध्ये सुमारे १८ टक्के मतदान झालं आहे. औरंगाबाद मध्यमध्ये दहा, औरंगाबाद पूर्वमध्ये नऊ, औरंगाबाद पश्चीममध्ये दहा तर गंगापूरमध्ये १२ आणि वैजापूरमध्ये सुमारे सात टक्के मतदान झालं आहे.

****



 लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील सर्व वीस तसंच कर्नाटकातल्या  चौदा, उत्तरप्रदेशतल्या दहा, छत्तीसगढमधल्या सात, ओडीशातल्या सहा, आणि बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी पाच जागांसाठी मतदान सुरू आहे.



 आसामच्या चार, गोव्याच्या दोन, तर जम्मू काश्मीर, दादर -नगरहवेली, दमण-दीव आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होत आहे.



 जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदार संघात सुरक्षेच्या कारणास्तव तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या असं एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानुसार आज अनंतनाग जिल्ह्यात मतदानाचा पहिला टप्पा आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी सुमारे दोन टक्के मतदान झालं असून, आतापर्यंत काहीही अप्रिय घटना घडली नसल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

     

 महाराष्ट्रातल्या चौदा लोकसभा जागांसाठी १९ महिलांसह २४९ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरातमधील सर्व २६ लोकसभा मतदार संघांसाठी ३७१ उमेदवार रिंगणात असून चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान शांततेत व्हावं यासाठी सुरक्षेचे व्यापक उपाय योजण्यात आले आहेत.

****



 राज्यात काही अपवाद वगळता, बहुतांश भागात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.



 सांगली शहरातल्या एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं, हे मतदान यंत्र सील करण्यात आलं. या मुळे या केंद्रावरचं मतदान सुमारे दोन तास बंद राहिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदान यंत्रावर बटन न दाबताही, भाजप उमेदवाराला मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं केली होती. ३८ जणांनी मतदान केलेलं असतानाही, या मतदान यंत्रावर ४० जणांनी मतदान केल्याचं दाखवलं जात होतं.

****



 जळगाव जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त आढळल्यानं मतदान उशीरा सुरू झालं. जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली. २९ व्हीव्हीपॅट, २२ बॅलेट युनीट बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचं ढाकणे यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद लोकसभा मतदार संघातही, काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातल्या बिघाडामुळे मतदान सुमारे अर्धा तास उशीरा सुरू झालं.



 जालना मतदार संघातही बदनापूर तालुक्यात काजळा इथल्या, मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्यानं, मतदार दोन तासा ताटकळत राहिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 सातारा मतदार संघातही कराड, पाटण तालुक्यातल्या तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले मुळे काही काळ मतदार ताटकळले होते. या ठिकाणी मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.



 कोल्हापूर मतदार संघात काही ठिकाणी मतदान सुरू झाल्यावर तासाभरातच, मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र या सर्व ठिकाणी तत्काळ मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात धामणी खोऱ्यातल्या सात गावांनी मतदानावर घोषित केलेला बहिष्कार मागे घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. पन्हाळा तालुक्यातलं कोदवडे, आकुर्डे, सुळे, वाघुर्डे, पनोत्रे आणि राधानगरी तालुक्यातल्या माणबेट आणि चौके या गावातले मतदार मतदान करत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...