Monday, 1 April 2019

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

****

काळा पैसा वैध केल्याप्रकरणी, उद्योजक रॉबर्ट वॉड्रा यांना आज दिल्ली न्यायालयानं पाच लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वॉड्रा यांना न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय देशाबाहेर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. वॉड्रा यांच्याविरोधात, काळा पैसा वैध करण्याच्या व्यवहारातून लंडन इथं, मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.

****

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१५ मध्ये दंगल घडवल्याप्रकरणी गुजरात मधल्या सत्र न्यायालयानं, पटेल यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती, या निर्णयाला स्थगिती देण्याची पटेल यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयानं फेटाळून लावली, त्यानंतर पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करत, तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली. हार्दिक पटेल काँग्रेसकडून गुजरातमधल्या जामनगर इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र या मतदार संघात अर्ज दाखल करण्याची मुदत चार एप्रिलला संपते आहे.

****

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत चार एप्रिलला संपते आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होत आहे. आजही अनेक ठिकाणी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार, सुभाष झांबड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत, क्रांतीचौक ते शहागंज अशी मिरवणूक काढून, सुभाष झांबड आज दुपारी आपल्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. झांबड यांच्यासह औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवारांचे एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत.

****

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे डॉ.सुजय विखे यांनी आज आपला अर्ज दाखल केला. सुजय विखे यांनी, मोठं शक्तिप्रदर्शन करत, शहरातल्या दिल्ली दरवाजापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून अर्ज भरला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुजय यांचे वडील, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र यावेळी गैरहजर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

माढा लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे रणजित नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

****

जालना लोकसभा मतदार संघासाठी आज अखिल भारतीय सेनेचे गणेश शंकर चांदोडे यांनी तर शहादेव महादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता पाच झाली आहे.

****

लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी प्रसारण तासांचे वाटप आज करण्यात आलं. सात राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी सहाशे मिनिटे तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रसारणासाठी ९०० मिनिटे मिळतील. ५२ राज्यस्तरीय पक्षांना, राष्ट्रीय प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी पाचशे वीस मिनिटे, तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एक हजार आठशे मिनिटं मिळणार आहेत.

****

सैन्य दलाचा पुणे इथला दक्षिण कमांड आज आपला १२५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा भारतातला सर्वात जुना आणि मोठा कमांड असून याची स्थापना एक एप्रिल १८९५ रोजी करण्यात आली आहे. ११ राज्यं आणि चार केंद्रशासीत प्रदेशांच्या संरक्षणाची जबाबदारी, या दक्षिण कमांडवर आहे. या निमित्त आज पुण्यात राष्ट्रीय युध्दस्मारकावर अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जालना तालुक्यातल्या रोहनवाडी सज्जाचे तलाठी प्रसाद हजारे याला पाच हजार रुपये लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. भुखंडाचा फेर घेऊन सातबारा देण्यासाठी त्यानं दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंबंधी तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून त्याला अटक केली.

//************//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...